Political Exclusive : रमेश बोरनारे शब्द फिरवणारे आमदार, खा. भागवत कराड यांचे टीकास्त्र, राजकीय स्वार्थापोटी भावाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूरमध्ये नगरपालिका निवडणुकीत सत्तेतील दोन पक्षांत झुंज सुरू झाली आहे. आ. रमेश बोरनारे यांनी घराणेशाही पुढे नेत भावाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली. त्यासाठी शब्द फिरवला, हा मुद्दा भाजप पुढे रेटत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गुरुवारी (२७ नोव्‍हेंबर) सायंकाळी साडेसातला वैजापूरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत खा. डॉ. भागवत कराड यांनी आ. बोरनारे यांच्यावर शरसंधान साधले. बोरनारे यांनी वैजापूरचा नगराध्यक्ष हा युतीमधील भाजपचाच असेल असा शब्द दिला होता. त्यांनी शब्द पाळला नाही. त्यांच्याकडे वारंवार विचारणा करूनही उत्तर दिले नाही. त्यामुळे बोरनारे शब्द फिरवणारे आमदार आहेत. राजकीय स्वार्थापोटी भावाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली, अशी टीका डॉ. कराड यांनी केली.

वैजापूर नगरपालिका भाजपच्या ताब्यात राहिली आहे. ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न आ. बोरनारे करत आहेत. त्यासाठी त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले असून, भाजपचे काही पदाधिकारी फोडून शिंदे गटात घेतले होते. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गट या निवडणुकीत भाजपसोबत असून, भाजपने नगराध्यक्षपदासाठी डॉ. दिनेश परदेशी यांना उमेदवारी दिली आहे. सभेला व्यासपीठावर मंत्री अतुल सावे, आ. विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, डॉ. दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी, बाळासाहेब संचेती उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेता वैजापूरमध्ये सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली.
प्रचाराला अवघे ३ दिवस शिल्लक असल्याने शिंदे गट आणि भाजप दोन्हींकडून जोरदार प्रचार सुरू आहे. २५ नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडण्यासाठी ही निवडणूक होत आहे. नगरसेवक पदासाठी ८० तर नगराध्यक्षपदासाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. २ डिसेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला वैजापूर पालिका कोणाच्या ताब्यात राहील, हे कळणार आहे, म्हणजेच मतमोजणी होणार आहे.

हे आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार
भाजप : डॉ. दिनेश परदेशी
शिंदे गट : संजय बोरनारे
काँग्रेस : सुभाष गायकवाड
परदेशींना ठाकरे गटासह शिंदे गटाच्याही नाराजांची साथ
दिनेश परदेशी यांना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटातील नाराज पदाधिकाऱ्यांचीही साथ मिळत आहे. काँग्रेसच्याही एका गटाची परदेशी यांना साथ आहे.

कन्नडमध्ये डॉ. कराड यांच्यावर भुमरेंची टीका
कन्नडमध्ये पालिका निवडणुकीत शिंदे गटाची लढाई अजित पवार गटाशी आहे. शिंदे गटाच्या प्रचार सभेत खासदार संदिपान भुमरे यांनी भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांच्यावर टीकास्त्र सोडले. औट्रम घाटासाठी मी प्रयत्न केले आहेत. आदेशात माझे नाव आहे; पण फलक मात्र इतरांचे लावले जातात, अशी खोचक टीका त्यांनी केली. कन्नड येथे शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची सभा झाली. व्यासपीठावर आमदार संजना जाधव, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता काकासाहेब कवडे आदींची उपस्थिती होती. 

माजी आमदार अण्णासाहेब मानेंची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार अण्णासाहेब माने यांनी थेट भाजपला शिंगावर घेण्यास सुरुवात केली आहे. आ. प्रशांत बंब यांना त्यांनी निशाण्यावर तर घेतलेच आहे, पण बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) च्या खुलताबादमधील सभेत थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्‍त्र सोडले. खुलताबादमधील मतदारांवर विश्वास नसल्याने भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला जिल्हाभरातून हजारो लोक आणले, असे माने म्हणाले. या निवडणुकीत शिंदे गटाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी बाबासाहेब बारगळ यांना दिली आहे. शहरातील समस्या मांडत माने यांनी गेल्या १६ वर्षांत आमदारांनी काय केले? असा सवाल केला.

जंजाळ -शिरसाटांच्या वादावर नगरपरिषद निवडणुकीनंतर तोडगा?
महापालिका निवडणुकीच्या तयारीत डावलले जात असल्याने शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांना मंत्री शिरसाट यांनीही प्रत्युत्तर दिले. दोघांतील वाद अधिक चिघळू नये म्हणून बुधवारी (२६ नोव्‍हेंबर) रात्री छत्रपती संभाजीनगरला आलेल्या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दोन्ही नेत्यांची भेट घेतली. नगरपालिका निवडणुकीनंतर दोघांच्या वादावर ते तोडगा काढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतासाठी जंजाळ पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते. गुरुवारी  मंत्री शिरसाट आणि डॉ. श्रीकांत शिंदे दिवसभर सोबत होते. राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले, की मंत्री शिरसाट पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात ही बाब डॉ. श्रीकांत शिंदे यांना समजली असून, त्यांनी नगरपरिषद निवडणुकीनंतर तोडगा काढणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, मंत्री शिरसाट म्हणाले, की खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत वादावर कोणतीही चर्चा झाली नाही. जंजाळ यांनी वादाला सुरुवात केली असल्याने त्यांनीच वाद मिटवावा.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software