‘युती’त बिनसले? जागा वाटप झाले तरी भाजप उमेदवारांनी शिंदे गटाला सुटलेल्या जागांसाठी भरले अर्ज!, फुलंब्री, कन्नड, पैठण, छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडाळी...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (२१ जानेवारी) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठाच राजकीय राडा पहायला मिळाला. महायुतीत बिनसल्याचे चित्र निर्माण झाले. भाजप मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी (२२ जानेवारी) संयुक्त बैठक घेऊ. महायुतीत बिनसणार नाही, असे म्हटले, तर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आतापर्यंत भाजपकडून बैठकीचा निरोप आला नाही. निरोप आला तर चर्चा करून मार्ग काढू, असे म्हटले आहे. युती झाल्याचे ठरल्यावर उमेदवारांना बी-फॉर्म देणे विश्वासार्हता कमी करणे आहे, अशी खंतही त्यांनी भाजपबद्दल व्यक्त केली.

सिल्लोड, सोयगाव तालुके वगळून जिल्हा परिषदेच्या ५२ जागांपैकी भाजप २७ तर शिंदे गट २५ जागा लढणार असल्याचे महायुतीत ठरले होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या इच्‍छुकांनी पक्षाला ठेंगा दाखवत उमेदवारी अर्ज भरले. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार गटाची जागा शिंदे गटाला सुटली आहे. मात्र भाजपचे गोपाळ वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरला तर पंचायत समिती गणातून सर्जेराव मेटे आणि निशा विजय आहेर यांनी दुपारी दोनला अर्ज भरले. या तिन्ही उमेदवारांनी भाजपचे अधिकृत एबी फॉर्म दाखल केले. शिंदे गटातर्फे मंगेश साबळे यांनी आधीच या गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपने विश्वासघात करणे चुकीचे आहे, असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश पवार म्हणाले, तर भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट म्हणाले, की तांत्रिक गैरसमजामुळे एबी फॉर्म देण्यात आले असावेत. एकत्र बसून तोडगा काढू.

कन्नडमध्येही असाच प्रकार पहायला मिळाला. भाजपने जागा वाटपाचा फॉम्यूला मोडला. समान ४-४ जागांचे वाटप झाले असताना चिंचोली लिंबाजी गटातून भरतसिंह राजपूत यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला. ही जागा शिंदे गटासाठी सुटलेली आहे. भाजपने गाफील ठेवले, त्यामुळे मलाही ३ उमेदवारांना शिंदे गटाचे बी-फॉर्म द्यावे लागले, असे आ. संजना जाधव म्हणाल्या. तर भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे म्हणाले, की पेच सोडविण्याचा प्रयत्‍न करू. युती टिकविण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रूक गटासाठी भाजपचे रामराव शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिंदे गटाचे विजय घोडके यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. लाडसावंगी गटात भाजपने विजय काळे यांना उमेदवारी दिली असताना, शिंदे गटाकडून राधाकिसन पठाडे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी पठाडे यांनी भाजपला राम राम करत आ. अनुराधा चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले.

पैठणमध्ये भाजप-शिंदे गटाचे पदाधिकारी भिडले 
पैठणमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनातच भाजप-शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार जुंपली. त्यांच्यातील गोंधळ वाढत गेल्याने अर्धा तास अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ठप्प झाली. भाजपचे दत्ता गोर्डे चार उमेदवारांचे एबी फॉर्म घेऊन आले होते. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला आक्षेप घेतला. भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास खिडकीतून चोरून एबी फॉर्म आत पाठवल्याचा आरोप शिंदे गटाने केला. ते स्वीकारू नये, अशी भूमिका घेतली. त्यावर गोर्डे यांनी ‘आम्‍ही वेळेतच आलो आहोत’, असा दावा केला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून उमेदवारांव्यतिरिक्‍त इतर सर्वांना दालनाबाहेर काढले. त्यानंतर साडेचार वाजेपर्यंत अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली.

खुलताबादमध्ये शिंदे गटाला एकही जागा नाही...
खुलताबाद तालुक्यात एकही जागा भाजपने शिंदे गटाला दिली नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या इच्‍छुकांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांच्या पत्नीला उमेदवारी न दिल्याने त्यांचा पत्ता आ. प्रशांत बंब यांनी कट केल्याचे दिसून आले. खुलताबाद तालुक्यात अजित पवार गट स्वतंत्र लढत आहे, तर महाविकास आघाडी एकसंध आहे.

‘मविआ’ला जमले...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड वगळता महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. ठाकरे गटाने २७ गट व २७ गण, काँग्रेस १८ गट, ३१ गण, वंचित बहुजन आघाडी ६ गट, १५ गण तर शरद पवार गटाने ४ गट, ८ गणांमध्ये निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. ठाकरे गटाचे आ. अंबादास दानवे यांनी कुठेही बंडखोरी झाली नाही, असा दावा केला आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software