न्यू श्रेयनगरातील २७ लाखांच्या लुटीचा मास्टरमाईंड निघाला चालकच; मुलाच्या मदतीने रचला कट, गुन्हे शाखेने दहा तासांतच आवळल्या मुसक्या!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : न्यू श्रेयनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या २७ लाखांच्या लुटीचा मास्टरमाईंड स्वतः चालक गणेश ओंकारराव शिंदे (वय ४८, रा. महात्रेवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) हाच असल्याचे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांत उघड केले. गणेशने त्याचा मुलगा अमोल (वय २४) याच्या मदतीने रक्कम लुटली. पोलिसांनी बाप- बेट्याला बेड्या ठोकल्या.

दिनेश राधेश्याम साबू (वय ४५, रा. मंगलधाम स्वरसंगम सोसायटी, न्यू श्रेयनगर, छत्रपती संभाजीनगर) हे जालन्यातील आयकॉन स्टिल कंपनीत नोकरी करतात. त्यांनी नाशिकमधील व्यापाऱ्यांकडून २७ लाख ५ हजार ९१० रुपयांची रक्कम जमा करून घरी आणली. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता ते गाडीचालक गणेश शिंदे याच्यासोबत जालन्याला कंपनीत रक्कम भरण्यासाठी जाणार होते. खासगी कारचालक गणेश शिंदे त्यांना घेण्यासाठी घरी आला. साबू यांनी पैसे असलेली बॅग त्याच्याकडे देऊन ती गाडीमध्ये ठेवण्यास सांगितले. यानंतर ते टिफिन घेण्यासाठी घरात गेले. काही क्षणातच गणेशच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते धावत बाहेर आले. या वेळी गणेशने दोघांनी आपल्या हातावर कटरचा वार करून पैशांची बॅग पळवून नेल्याचे साबू यांना सांगितले. साबू यांनी तातडीने गणेशला दवाखान्यात उपचारासाठी नेऊन तातडीने या प्रकरणी उस्मानपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. 

...अन् भंडाफोड झाला!
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याचा तपास शहर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक माहिती जमा केली. यावेळी त्यांना चालक गणेशवरच संशय आला. कारण गंभीर जखमी होऊनही गणेशला भेटण्यासाठी दवाखान्यात कुटुंबातील कोणीही आले नव्हते. शिवाय पोलिसांनी गणेशची पार्श्वभूमीही तपासली. यातून त्याची पत्नी सतत आजारी असल्याचे आणि जुगाराच्या सवयीमुळे गणेश कर्जबाजारी झाल्याचे समोर आले. वाहन चालविताना गणेशला कमी दिसत असल्याचेही समोर आले. पोलिसांनी सर्व तपास त्याच अनुषंगाने सुरू केला. यातून मोठी रक्कम लुटून कर्जमुक्त होण्याच्या हेतूनेच गणेशने मुलगा अमोलच्या मदतीने लुटीचा डाव आखल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हालचाल करून गणेश आणि त्याचा मुलगा अमोलच्या त्यांच्याच गावातून मुसक्या आवळल्या. दोघांच्या ताब्यातून २५ लाख २ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

बापलेकाची पोलीस कोठडीत रवानगी
ही कारवाई पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, संदीप काळे, अभिजीत चिखलीकर, सहायक फौजदार दिलीप मोदी, सुनील बडगुजर, अंमलदार राजेंद्र सोळंके, योगेश गुप्ता, संजय गावंडे, अमोल शिंदे, सिद्धार्थ थोरात, तात्याराव शिनगारे, विक्रम खंडागळे, मनोहर गिते, राहुल बंगाळे, प्रमोद सुरसे, विजय घुगे, श्याम आढे, गणेश सागरे, दादासाहेब झारगड, सोमनाथ दुकले, संजीवनी शिंदे यांच्या पथकाने केली. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी चौरे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software