खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी चीट फंडची ‘चिटिंग’; डॉक्टर महिलेसह तिघांना लाखोंचा गंडा, आणखीही तक्रारदार समोर येण्याची शक्यता

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जालना रोडवरील आकाशवाणी समोरील गोदावरी चीट फंड प्रा.लि. कंपनीने भिशीच्या नावाखाली डॉक्टर महिलेसह दोघांना फसवल्याचे समोर आले आहे. फसवले गेलेले आणखी गुंतवणूकदारही समोर येण्याची शक्यता आहे. डॉक्टर महिलेने आपली ८ लाख ९० हजार ३४९ रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार केली. अद्याप अन्य दोघांच्या फसवणुकीचे आकडे समोर आलेले नाहीत. एकूण गुंतवणूकदारांचा विचार करता या कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांनी गंडा घातल्याची शक्यता आहे. या प्रकरणात बेगमपुरा पोलिसांनी कंपनीच्या संचालकांसह एकूण ९ जणांविरुद्ध सोमवारी (१६ डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. ज्योती प्रल्हाद कस्तुरे (वय ४३, रा. सुमती पार्क, श्रीनगर हौसिंग सोसायटी, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, गोदावरी चीट फंड प्रा.लि. या शासकीय मान्यता प्राप्त आणि रजिस्टर्ड कंपनीच्या लिलाव भिशीब‌द्दल गोदावरी चीट फंड प्रा.लि.च्या वतीने कंपनीचे मॅनेजर रविकिरण प‌द्माकर जगताप व शैलेश रविकिरण जगताप यांनी परिचितांचा दाखला देऊन संपर्क केला. त्यांच्या कंपनीच्या स्किमबद्दल माहिती देऊन आणि लिलाव भिशीच्या गुंतवणुकीतून कसा बाजारभावापेक्षा जास्त परतावा देण्यात येतो, याची माहिती दिली. शेवटी अधिक परतावा आणि गुंतवणूक जोखमीची नसल्याचे आश्वासन देऊन कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चंद्रकांत वाडेकर यांच्या वतीने कागदपत्रांची पूर्तता पूर्ण करून भिशी सुरू करून दिली. लिलाव भिशीत डॉ. ज्योती यांच्या परिचयातील काही माणसे मेंबर म्हणून आहेत याचे दाखले सुध्दा त्यांनी दिले होते. लिलाव भिशीतील २ गटांसाठी (१० लाख रुपये आणि २५ लाख रुपये) डॉ. ज्योती यांची नाव नोंदणी करून पहिल्या गटातील सर्व ४९ महिने आणि दुसऱ्या गटात ३५ महिने हप्ते भरून घेतले. यानंतर दुसऱ्या गटाची (२५ लाख रुपये) भिशी चालविण्यास असमर्थता दर्शवून पुढील हप्ते भरणा बंद करण्यास सांगितले. नोव्हेंबर २०२३ या महिन्यात माझ्या पहिल्या दहा लाखांची रक्कम कंपनीने त्यांचे कमिशन कापून घेऊन म्हणजेच ९ लाख ५१ हजार रुपये तत्काळ देणे अपेक्षित होते. मात्र संदीप उमाळे याने तुमचे पैसे लवकरच मिळतील, अशा संभ्रमात ठेवले. मात्र आजपर्यंत रक्कम दिली नाही. 


म्हणाले, आम्ही काय तुरुंगात बसू!
आज देतो उ‌द्या देतो अशी टाळाटाळ करून शेवटी कंपनीचे आर्थिक व्यवहार अडचणीत असल्याचे कारण देत कंपनीच्या वतीने मॅनेजर रविकिरण जगताप आणि भिशीचे हप्ते भरून घेण्याची जबाबदारी असलेल्या संदीप उमाळे यांनी कंपनीचे सर्वेसर्वा विलास गणपतराव सोनुने यांच्या वतीने आपण दुसऱ्या गटात पैसे भरणे थांबवा, असे सांगून त्या भिशीतील सुध्दा जमा रक्कम परत करू, असे सांगितले. विलास सोनुने हा अतिशय विचित्र माणूस असून त्याच्या कलाकलाने आपल्याला सर्वांना वागावे लागेल, असे सांगून कंपनी आणि आम्हाला तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. सर्व पुरावे तुमच्या हातात आहेत. मात्र काय‌द्याने कारवाई करायला गेलात तर आणि आम्ही काय तुरूंगात जाऊन बसू. मात्र तुमचे सर्व पैसे बुडाले असे समजा, असे सांगून संयमाने परिस्थिती हाताळण्याशिवाय पर्यात नसल्याचे सांगितले.

अडीच-अडीच लाखांचे २ धनादेश दिले, एक वठला, दुसरा बाऊन्स झाला...
३ फेब्रुवारी २०२४ ला डॉ. ज्योती या कंपनीच्या ऑफिसला जाऊन बसल्या. त्यावेळी ५ लाखांचे धनादेश देऊन त्यांनी बोळवण केली. दोन्ही भिशींची भरलेली रक्कम आणि त्यावरील परतावा मिळून रक्कम साधारणपणे २७ लाख रुपये होते. मार्च २०२४ च्या अखेरपर्यंत अर्धा आणि त्यापुढे लगेच उर्वरित रक्कम परत करतो, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र खूप पाठपुरावा केल्यावर पुढील तीन महिन्यांत चार लाख रुपयांचे चेक आणि बँकेतून ट्रान्सफर या स्वरुपात कसेबसे डॉ. ज्योती यांना मिळाले. पहिल्या दहा लाखांसाठी म्हणून दिलेले प्रत्येकी अडीच लाखांचे २ धनादेशपैकी केवळ एक धनादेश वठला. दुसरा धनादेश फेटाळला गेला आहे.

पोलिसांत तक्रार करताच ७ लाख दिले, पण बाकीचे पैसे दिलेच नाहीत...
आठवड्याला पन्नास हजार रुपये किंवा महिना अखेरीस दोन लाख रुपये टप्प्याटप्प्याने देण्याचे कबूल करून पुढील तारखांचे चेक अनामत म्हणून दिले. मात्र प्रत्यक्षात कबूल केल्याप्रमाणे जून २०२४ मध्ये केवळ ५० हजार रुपयेच दिले. अनामत म्हणून दिलेले सर्व चेक बाऊन्स झाले. त्यानंतर डॉ. ज्योती यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केल्याने हादरलेल्या भामट्यांनी हस्तकांमार्फत डॉ. ज्योती यांना संपर्क करून देय रक्कम परत करतो, तक्रार मागे घ्या, अशी विनंती सुरू केली. डॉ. ज्योती यांच्या खात्यात ७ लाख रुपये वर्ग केले. मात्र उर्वरित मुद्दल रक्कम तसेच भरलेल्या रकमेवरील व्याजाची रक्कम अशी एकूण ६ लाख ४० हजार व कायदेशीर कारवाईसाठी लागलेला खर्च अडीख लाख रुपये अशी एकूण रक्कम ८ लाख ९० हजार ३४९ रुपये देण्याचे कबूल करूनही दिले नाहीत.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
अखेर डॉ. ज्योती यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गोदावरी चीट फंड प्रा.लि. कंपनी पत्ता पहिला मजला, ऑफिस नं.१११, सागर ट्रेड सेंटर, आकाशवाणी समोर, जालना रोड, छ. संभाजीनगर येथील संचालक विलास गणपतराव सोनुने, सचिन भारत शिंधीकुमाटे, श्रीमती शीला उत्तमराव वानखेडे, शैलेश रविकिरण जगताप, योगेश हरिश्चंद्र घटकार, अमोल बी. साखरे, व्यवस्थापक रविकिरण प‌द्माकर जगताप, अकाऊंटंट विक्की भारूका, सुरेश दिलीपराव सर्जे यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर महिलाच नाही हेही फसले...
डॉ. ज्योती यांच्यासह संदीप विलास मुळे (वय ३७, रा. टिळकनगर, कन्नड), पुरुषोत्तम सोपान तायडे (वय ३४, रा. शिवाजीनगर, ब्राह्मण गल्ली, कन्नड) व इतरांची फसवणूक गोदावरी चीट फंड कंपनीच्या संचालक, अधिकाऱ्यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पतसंस्था, बँका, फायनान्स कंपन्या आणि आता चीट फंडच्या नावाखाली घोटाळा झाल्याने गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे  झाले आहे. या प्रकरणात आणखी गुंतवणूकदारही समोर येऊ शकतात. त्यामुळे फसवणुकीचा आकडा वाढू शकतो. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविकिरण कदम करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software