पैठण गेट भागातील ११८ अतिक्रमणांवर चालला बुलडोझर!, आज पडेगाव रोड-एमजीएम गोल्फ क्लब रस्त्यावर पाडापाडी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणगेटजवळ झालेल्या युवकाच्या खुनामुळे ऐरणीवर आलेल्या या भागातील अतिक्रमणांचा प्रश्न अखेर महापालिकेने बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) आक्रमकपणे सोडवला. पैठण गेट, सब्जीमंडी परिसरातील मुख्य रस्ते मोकळे करताना ११८ हून अधिक दुकाने, निवासस्थानांवर बुलडोझर चालवला. सब्जीमंडीत ९ मीटर म्हणजेच ३० फूट रूंद झालेला रस्ता पाहून सारेच आश्चर्यचकीत झाले आहेत. आज, २० नोव्‍हेंबरला पडेगाव रोड ते एमजीएम गोल्फ क्लबपर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे पाडण्यात येणार आहेत. हा रस्ता १०० फूट रूंद आहे.

१० जेसीबी, २ पोकलेन, १०० पोलीस, महापालिकेचे १०० अधिकारी-कर्मचारी, १० टिप्पर, २ रुग्णवाहिका, २ कोंडवाडे, अग्निशमन विभागाच्या  २ गाड्या अशा लावाजामा सकाळी १० वाजताच पैठण गेटवर धडकला. अतिक्रमणे काढण्याआधी महापालिकेच्या पथकाने टोटल स्टेशन सर्व्हे केला होता. त्यानंतर मार्किंग करून काही दिवसांचा अवधी अतिक्रमणे काढून घेण्यासाठी दिला होता. बहुतांश अतिक्रमणधारकांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली होती. ज्यांनी महापालिकेचे आवाहन गांभीर्याने घेतले नाहीत, त्यांच्या अतिक्रमणांवर सकाळी साडेदहापासून पासून बुलडोझर चालायला सुरुवात झाली. दुपारी दीडपर्यंत अतिक्रमणांची पाडापाडी झाली.

सायंकाळपर्यंत लोखंडी पत्रे, मलबा हटविण्याचे काम करण्यात आले. पैठण गेट मोबाइल हब म्हणून ओळखला जात होता. हा हब आता राहिला नाही. पैठण गेटच्या पार्किंगच्या उजव्या बाजूला ३ मजली इमारतीचा दर्शनी भाग अतिक्रमणात येत होता, पोकलेनने तोही पाडण्यात आला. मालमत्ताधारकाने मार्किंगनुसार जागा मोकळी करून देण्याचे आश्वासन दिल्यावर पथकाने वेळ दिला. दलालवाडीमार्गे खोकडपुऱ्याकडे जाणारा सब्जीमंडीचा रस्ताही मोकळा करण्यात आला. हा रस्ता १२ मीटर रूंद आहे. सब्जीमंडीतील ९ मीटर रस्ता तर अक्षरशः अतिक्रमणधारकांनी गिळला होता, तिथून केवळ दुचाकी जायची. आता तिथून दोन चारचाकी वाहने सहज जाऊ शकतील.

atik (1)

महापालिकेने पैठण गेट पार्किंगच्या पूर्व दिशेला इमारत बांधली होती. या इमारतीत आठ दुकाने होती. दुकानांवर ३ कुटुंबांचे अनेक वर्षांपासून अनधिकृत वास्तव्य होते. ही बाब कारवाईदरम्यान समोर आल्यानंतर पूर्ण इमारतच जमीनदोस्त करण्यात आली. व्यावसायिक दृष्टीकोनातून ही इमारत बांधण्यात आली होती. ८ व्यापारी व्यवसायही करत होते. ही पूर्ण इमारतच रस्त्यात येत असल्याचे लक्षात आल्यावर दोनच मजले बांधून तिसऱ्या मजल्याचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले होते.

सनी कॉर्नरचा कारनामा
महापालिकेने ११० व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन मालकीहक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिला होते. मात्र केवळ चार ते पाच मालमत्ताधारक समोर आले. अन्य मालमत्तधारकांकडे कागदपत्रेच नव्हती. त्यामुळे कारवाईला वेग आला. पैठण गेटच्या कोपऱ्यावरील सनी कॉर्नर ही इमारत मालक न्यायालयात गेल्याने वाचली. त्याच्याकडे बांधकाम परवानगी आहे, मात्र भोगवटा प्रमाणपत्र नाही. नव्या विकास आरखाड्यात ही इमारत बाधित होत असून, पार्किंगसाठी जागा नाही, वरचा मजला अनधिकृत आहे. त्यावर धोकादायक होर्डिंगही लावले आहे, हे विशेष. 

हर्सूलमध्ये मालमत्ताधारकांचे उपोषण सुरू
पैठणगेट भागात ज्या आक्रमक आणि तत्परतेने कारवाई करण्यात आली ती पाहून पोटात गोळा आलेल्या हर्सूल गावातील बाधित मालमत्ताधारकांनी बुधवारी सायंकाळी ७ ला एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले. हर्सूल गावातील मुख्य रस्ता २०० फूट रूंद करण्यात येणार असून, त्यात ज्यांच्या मालमत्ता बाधित होत आहेत, त्यांना त्या काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आधी भूसंपादन करा, अशी मागणी मालमत्ताधारकांनी केली आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software