- News
- सिटी क्राईम
- Update : महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात वकील महिलेसोबत अश्लील वर्तन; अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्ह...
Update : महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयात वकील महिलेसोबत अश्लील वर्तन; अभियंत्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, अभियंत्याचीही तक्रार, वकील महिलेसह राजकीय नेत्याच्या भावाविरुद्ध गुन्हा
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीड बायपास भागातील महापालिका वॉर्ड कार्यालयात मंगळवारी (२३ जुलै) सकाळी घराचा कर जास्त आल्याने विचारणा करण्यास गेलेल्या वकील महिलेसोबत महापालिकेच्या अभियंत्यासह एकाने अश्लील वर्तन केले. शिवीगाळ करून धमकी दिली. वकील महिलेने सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात अभियंत्यानेही तक्रार दिली असून, पोलिसांनी […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बीड बायपास भागातील महापालिका वॉर्ड कार्यालयात मंगळवारी (२३ जुलै) सकाळी घराचा कर जास्त आल्याने विचारणा करण्यास गेलेल्या वकील महिलेसोबत महापालिकेच्या अभियंत्यासह एकाने अश्लील वर्तन केले. शिवीगाळ करून धमकी दिली. वकील महिलेने सातारा पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात अभियंत्यानेही तक्रार दिली असून, पोलिसांनी वकील महिलेसह तिचा साथीदार गोरख पंढरीनाथ राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राठोड हे एका राजकीय पदाधिकाऱ्याचा बंधू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
२६ वर्षीय वकील महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्या बाळापूर फाटा बीडबायपास भागात राहतात. मंगळवारी सकाळी अकराला त्या देवळाई बीड बायपास भागातील महापालिका वाॅर्ड कार्यालयात घराचा कर जास्त आल्याने विचारणा करण्यासाठी गेल्या होत्या. तेथील अभियंता कृष्णा परभतराव ठोकळ याच्याकडे त्या विचारणा करत असताना तिथे बसलेल्या बाजीराव पांडुरंग हिवाळे याने त्यांना अरेरावी सुरू केली. तो वकील महिलेला म्हणाला, की मी इथला दादा आहे, येथे माझ्या म्हणण्याप्रमाणे काम होते. माझ्या परवानगीशिवाय काही होत नाही. तू येथून बाहेर हो. तू आतमध्ये कशी काय आली… त्याचवेळी अभियंता ठोकळ हा म्हणाला की, हिला आधी बाहेर काढा.
दरम्यान, याच प्रकरणात अभियंता कृष्णा परभतराव ठोकळ (५०) यांनीही तक्रार दिली असून, तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की ते वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून कार्यरत आहेत. सकाळी अकराला वकील महिला तिथे आली. त्यांनी १ लाख रुपये कर कसा आला, असा प्रश्न केला. त्यावर ठोकळ यांनी तिला सव्वानऊ वर्षांचा थकीत मालमत्ता कर आहे. तुमची तक्रार असेल तर लेखी स्वरूपात अर्ज करा, असे सांगितले.
अभिलेख तपासून नियमाप्रमाणे कर आकारण्यात येईल, असे सांगितले. ठोकळ तिला समजावून सांगत असताना गोरख राठोड केबिनमध्ये शिरला. त्याने मी प्रमोद राठोडचा भाऊ असल्याचे सांगितले व अरेरावी सुरू केली. शिवीगाळ करून गोंधळ घातला. कर भरण्यासाठी आलेले बाजीराव हिवाळे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता राठोडने त्यांना धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी वकील महिलेसह गोरख राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बाजीराव हिवाळे कोण?
दरम्यान, या प्रकरणात वकील महिलेने ज्या बाजीराव पांडुरंग हिवाळेविरुद्ध तक्रार दिली आहे, तो बाजीराव नक्की कोण आहे, त्याचा महापालिकेच्या कार्यालयात संबंध कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अभियंत्याच्या तक्रारीनुसार, तोही कर भरायला आला आणि त्याने मध्यस्थीचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. पण कोणता सामान्य माणूस कर भरायला आल्यानंतर इतकी टोकाची मध्यस्थी करेल, असाही प्रश्न व्यक्त केला जात आहे. वकील महिलेच्या तक्रारीनुसार, बाजीरावे त्यांना धमकावले, की मी इथला दादा आहे, येथे माझ्या म्हणण्याप्रमाणे काम होते. माझ्या परवानगीशिवाय काही होत नाही… बाजीराव हा महापालिकेतला कोण, याबाबत आता पोलिसांनीही सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

