- News
- सिटी क्राईम
- कपिल पिंगळे मर्डर केस : ठोंबरे-फत्तेलष्करची समोरासमोर करणार चौकशी; ठोंबरेच्या मोबाइलचा पूर्ण डेटाही
कपिल पिंगळे मर्डर केस : ठोंबरे-फत्तेलष्करची समोरासमोर करणार चौकशी; ठोंबरेच्या मोबाइलचा पूर्ण डेटाही तपासणार
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील लॉज-हॉटेल व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्याप्रकरणाचा मास्टरमाइंड तथा रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरे आणि मारेकरी जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर या दोघांची एकाचवेळी चौकशी होणार असून, यासाठी हर्सूल कारागृहातून यशला पुन्हा ताब्यात घेतले जाणार आहे. दरम्यान, हत्येच्या काही तासांतच शिवराम सर्व मारेकऱ्यांना […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील लॉज-हॉटेल व्यावसायिक कपिल सुदाम पिंगळे (वय ३१, रा. रांजणगाव शेणपुंजी) याच्या हत्याप्रकरणाचा मास्टरमाइंड तथा रांजणगाव शेणपुंजीचा उपसरपंच शिवराम ठोंबरे आणि मारेकरी जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर या दोघांची एकाचवेळी चौकशी होणार असून, यासाठी हर्सूल कारागृहातून यशला पुन्हा ताब्यात घेतले जाणार आहे. दरम्यान, हत्येच्या काही तासांतच शिवराम सर्व मारेकऱ्यांना लाडगावच्या हॉटेल जय महाराष्ट्रमध्ये भेटला होता. तेथे ते आणखी एका अनोळखी व्यक्तीला भेटले. त्याला कपिलच्या हत्येच्या कटाविषयी माहिती होती. पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत.
वाळूज एमआयडीसीतील कोट्यवधी रुपयांच्या अवैध व्यवसायाच्या वर्चस्ववादातूनच कपिलची हत्या शिवराम ठोंबरेने घडवून आणल्याचा संशय आहे. या प्रकरणात सध्या ठोंबरेसह जयेश ऊर्फ यश संजय फत्तेलष्कर (वय २४, रा. गोगानाथनगर, बेगमपुरा), ठोंबरेचा मेहुणा अमर ऊर्फ सोनू शिंदे (वय ३१, रा. जि. जालना), विकास सुरेश जाधव (वय १९, रा. रामनगर, जालना), सागर उर्फ जितसिंग विलास मुळे (वय २३, रा. शनी मंदिराजवळ, जालना) आणि भरत किसन पंडुरे (वय ३३, रा. बेगमपुरा), अमर ऊर्फ अतुल गणेश पवार (४०, रा. हमालपुरा, जालना), अमर ऊर्फ सोनू सुरेश शिंदे (३१, रा. कार्ला, ता.जि. जालना) हे अटकेत आहेत. कपिल व यश हे पूर्वी शिवराम ठोंबरेसाठी काम करत होते. मात्र काही दिवसांपासून कपिल कानाच्या वर जाऊ लागला होता. कपिलचा परिसरातील वाढता वावर व प्रस्थ शिवरामला सहन होत नव्हते.
जालन्याचे अनेक गुन्हेगार यशच्या संपर्कात असतात, याची शिवरामला कल्पना होती. बेगमपुऱ्यातील एका कथित गुंडाचा यशसोबत पूर्वीचा वाद आहे. या गुंडासोबत मिळून कपिल आपल्या दोघांना मारण्याचा कट रचत आहेत, आपला जीव धोक्यात आहे, असे शिवराम जाणूनबुजून यशला सांगू लागला. त्यामुळेच यश डोक्यात कपिलबद्दल कमालीचा राग निर्माण झाला. तू खून कर, मी पुढे पाहून घेतो, असे शिवरामने यशला सांगितले होते. वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत १९ जुलैला पहाटे साईबाबा चौकात कपिल सुदाम पिंगळे (वय ३३, रा. देवगिरी कॉलनी, रांजणगाव शेणपुंजी) याचा मृतदेह आढळला होता. कपिलला यशने गुरुवारी रात्री भेटायला बोलावले.
कपिलसोबत यश व त्याच्या ३ मित्रांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले. मध्यरात्री कपिलला घरी सोडण्याचा बहाणा करून रांजणगावच्या दिशेने कारमधून सारे निघाले. कारमध्ये सुपारी दिल्याच्या कारणावरून यशने कपिलसोबत वाद सुरू केला. विकासने कपिलला मारहाण केली. यशने त्याच्याजवळ असलेल्या गावठी पिस्तुलाने कपिलच्या खांद्याजवळ गोळी झाडली, तर सागरने चाकूने कपिलवर १७ वार केले. मोठा रक्तस्त्राव होऊन कपिल कारमध्येच निपचित पडला. तो मरण पावल्याची खात्री झाल्यावर चौघांनी वडगाव कोल्हाटीच्या खदानीजवळ मृतदेह टाकून दिला.

