Special Story : ऑरिक सिटीतील ‘मसिआ एक्स्पो’चा फियास्को उडण्यामागे समोर आली मोठी कारणे!; उद्योगपतींच्या पैशांचा अपव्यय, मुख्य संयोजकांपासून आयोजकांपर्यंत कुठे चुकले नियोजन...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (संजय निकम : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेंद्र्यातील ऑरिक सिटीत ८ जानेवारीपासून सुरू असलेल्या ‘मसिआ’चा ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो २०२६’ महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत झाकोळला गेला आहे. आयोजकांच्या गलथान कारभारामुळे या एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या उद्योगांच्या पैशांचा अक्षरशः अपव्यय झाला आहे. व्यापक प्रमाणावर न केलेल्या प्रसिद्धीमुळे एक्स्पोला गर्दी तर सोडा पण येणारी माणसे आयोजकांना अक्षरशः मोजावी लागत आहेत. काहीही करून एक्स्पोला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांना छाती पिटवून सांगावे लागत असले तरी, प्रत्यक्षातील प्रतिसाद पाहून उद्योजक मात्र चिंतित आहेत. आज, उद्या (१० व ११ जानेवारी) हे दोनच दिवस उद्योजकांच्या हाती आहेत. उद्योजक आयोजकांवर खापर फोडताना दिसत आहेत.

औद्योगिक प्रदर्शनाचा झगमगाट उद्‌घाटनातही दिसला नाही. उद्‌घाटनाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तुरखुद्द उद्योगमंत्री उदय सामंत हेही आले नाहीत. आयोजक त्यांना आणण्यात कमी पडल्याची चर्चा सुरू आहे. ऐनवेळी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आणि मंत्री संजय शिरसाट आणि डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन उरकण्यात आले. उद्‌घाटनालाही तुटपुंजी गर्दी होती. याचे कारण व्यापक प्रसिद्धी करण्यात आली नाही, असे सांगण्यात येते.
मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाचे स्वप्न दाखवत, स्थानिक उद्योजकांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची ग्वाही या प्रदर्शनातून आयोजकांनी दिली होती. त्यामुळे अनेक उद्योजकांनी लाखो रुपये खर्चून सहभाग घेतला. पण हे प्रदर्शन ‘मसिआ’चाच गल्ला भरण्यात यशस्वी होताना दिसत असून, प्रत्यक्षात उद्योजकांचा अपेक्षाभंग होताना दिसत आहे.

‘मसिआ’च्या अध्यक्षपदी अर्जुन गायकवाड यांची निवड झाल्यापासून ते फारसे कुणाला विश्वासात घेताना दिसत नाहीत. संघटनेच्या ज्‍येष्ठांचेही ऐकत नाहीत, असा आरोप होताना दिसतो. त्याचाच परिणाम एक्स्पोचा फियास्को उडण्यात झाल्याची चर्चा उद्योजकांमध्ये सुरू आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनातील दोन दिवस तर असेच वाया गेले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खरेदीदार, मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्णयक्षम अधिकारी यांची उपस्थिती अत्यंत तोकडी असून, त्यामुळे कोणताही प्रत्यक्ष लाभ होत नसल्याची खंत सहभागी उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीच्या सावलीत एक्स्पोची आहुती
सध्या जिल्ह्यात आणि राज्यात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जो-तो सत्तेच्या समीकरणात व्यस्त आहे. उद्योग, रोजगार, विकास याकडे केवळ घोषणात्मक पातळीवर पाहिले जात आहे. याच राजकीय गोंधळात मसिआ एक्स्पो भरविण्यात आल्याने, हा उपक्रम पूर्णपणे दुर्लक्षित ठरत आहे. आमंत्रित पाहुणे केवळ औपचारिक उपस्थिती दाखवून निघून गेले. काहींनी तर उद्‌घाटनानंतर पुन्हा एक्स्पोत पाऊल ठेवले नाही. 

उद्योगपतींच्या पैशांचा पाण्यासारखा अपव्यय
या एक्स्पोसाठी स्टॉल भाडे, सजावट, वाहतूक, कर्मचारी, साहित्य अशा विविध बाबींवर उद्योगपतींनी मोठा खर्च केला आहे. मात्र, अपेक्षित प्रतिसाद नसल्याने हा सर्व खर्च वाया जात असल्याची चिंता त्यांना भेडसावत आहे. उद्योग आधीच मंदी, कर्जबाजारीपणा आणि बाजारातील स्पर्धेने त्रस्त असताना, अशा प्रकारच्या अपयशी आयोजनामुळे त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. सरकार आणि संघटनांनी आम्हाला व्यासपीठ देण्याऐवजी आमचाच वापर केला, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक उद्योजकांनी व्यक्त केली असून, आयोजकांवर खापर फोडले आहे.

ऑरिकसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक क्षेत्रात नियोजनाचा अभाव
ऑरिक सिटी ही राज्याची महत्त्वाकांक्षी औद्योगिक संकल्पना आहे. मात्र, अशा ठिकाणी होणाऱ्या महाएक्स्पोचे नियोजन अत्यंत तोकडे आणि बेफिकीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहतूक व्यवस्था, प्रसिद्धी, उद्योगजगताशी समन्वय, आंतरराष्ट्रीय संपर्क या सर्व बाबी केवळ कागदावरच असल्याचे दिसते. चर्चासत्रे, बैठका, स्टॉल्सना भेटी होत असल्याचे आयोजक मोठ्या प्रमाणावर सांगत आहेत, प्रत्यक्षातील चित्र या सर्व उपक्रमांना अत्यंत तोकडे आहे. मुख्य संयोजक अर्जुन गायकवाड यांनी पुढेतरी सर्वांना विश्वासात घेऊन चालण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

जबाबदारी कोणाची?
एक्स्पो मराठवाड्याच्या औद्योगिक इतिहासातील एक संधी ठरू शकला असता. मात्र, दिखावा, अपुरे नियोजन आणि उद्योजकांच्या वास्तव समस्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हा सोहळा सध्या तरी सपशेल अपयशाच्या दिशेने सरकताना दिसत आहे. उद्योगांना व्यासपीठ हवे होते, पण नियोजनातील हलगर्जीपणा, मुख्य संयोजकांची मनमानी यामुळे अशा उपक्रमांकडे यापुढे उद्योजक कोणत्या नजरेने पाहतील, याबाबतही शंकाच आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!

Latest News

मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार! मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दुचाकीचा चुकून धक्का लागल्याने एकाने दुचाकीस्वारावर चाकूचे वार करून जखमी केले. ही घटना मुकुंदवाडीतील...
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
प्रवासी म्हणून बसवले, दुसरीकडेच रिक्षा नेत विद्यार्थ्याला लुटले!; मुकुंदवाडीतील घटना
गव्हाबरोबर गांजा वाढवला... पोलिसांचा शेतात छापा, ५ लाखांचा गांजा जप्त, शेतकऱ्याला अटक, करमाडजवळील कारवाई
वाळूज MIDC तील कमळापुरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी; ४ गंभीर जखमी, वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्‍थळी, परिस्थितीवर नियंत्रण (व्हिडीओसह)
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software