मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हडको एन १२ मधील प्रसिद्ध सत्यविष्णू हॉस्पिटलचे डॉ. इफ्तेखार गफ्फार पटेल (वय ५२, रा. हडको एन १२) यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या मुसक्या सिटी चौक पोलिसांनी शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी साडेदहाच्या सुमारास आवळल्या. पोलिसांनी हॉस्पिटलमध्येच सापळा रचला होता, खंडणीबहाद्दर आले, पैशांची बॅग घेतली, त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना इशारा केला आणि लगेचच पोलिसांनी खंडणीबहाद्दरांवर झडप घातली.

डॉ. पटेल यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे हडको एन १२ मध्ये सत्यविष्णू हॉस्पिटल आहे. ते कॅन्सर रुग्णांवर उपचार करतात. हमजा अन्सारी (रा. धुळे) हे मार्च २०२३ मध्ये कॅन्सर उपचारासाठी डॉ. पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सुमारे ४ महिने हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेतले. त्यानंतर त्यांनी तिथून डिस्चार्ज घेऊन इतरत्र औषधोपचार घेतले. त्यावर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोन वर्षांनी अन्सारी यांचे नातेवाइक सय्यद मुशाहिद अली व समीर खाटीक (रा. धुळे) हे डॉ. पटेल यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी हॉस्पिटलमधील व्हिडीओ रेकॉर्डिंग करून व्हिडीओ सोशल मीडियावर टाकेल. हॉस्पिटलची तोडफोड करेल, अशा धमक्या दिल्या.

तेव्हापासून त्यांनी डॉ. पटेल यांना ५ लाख रुपये खंडणीची मागणी सुरू केली. त्यानंतर ५ मार्च २०२६ रोजी डॉ. पटेल यांनी पोलिसांत तक्रार केली होती. तक्रार दिल्यानंतरही परत सय्यद मुशाहिद अली व समीर खाटीक यांनी कॉल करून खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास जीवे मारतो, असे धमकावले. तुझ्यासाठी कबर खोदून ठेवली आहे, असे सांगून १३ मार्चला सत्यविष्णू हॉस्पिटलमध्ये येतो, असे म्हणून तत्काळ ५ हजार रुपये फोन पेवर टाकण्यासाठी धमकावले. त्यामुळे घाबरून डॉ. पटेल यांनी ५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर डॉ. पटेल यांनी ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांना दिली. शिंदे यांनी त्यांना १३ मार्चला सकाळी ९ वाजता सिटी चौक पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.

डॉ. पटेल यांच्याकडून सर्व माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी खंडणीखोरांना पकडण्यासाठी सापळा रचण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लहान मुलांच्या खेळण्यातील ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल बनवून ते खरे ५ लाख रुपये भासतील यासाठी प्रत्येक बंडलवर ५०० रुपयांच्या खऱ्या नोटा खालून आणि वरून ठेवल्या. त्यानंतर सत्यविष्णू हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी सापळा रचला. सकाळी साडेदहाला डॉ. पटेल हे त्यांच्या केबीनमध्ये बसले. तिथे तीन जण आले. त्यांनी त्यांची नावे जफर नूर खाटीक, मोहम्मद समीर मोहम्मद जाकीर, सय्यद मुशाहिद अली मुमताज अली अशी सांगितली. त्यांनी खंडणीच्या रकमेची मागणी डॉ. पटेल यांच्याकडे केली.

डॉ. पटेल यांनी पैशांची बॅग जफर नूर खाटीकच्या हातात दिली. त्यानंतर केबीनबाहेर येऊन पोलिसांना इशारा केला. त्याचवेळी पोलिसांनी खंडणीखोरांवर हल्लाबोल केला. केबीनमध्येच त्यांना पकडले. त्यांच्यासोबत आलेले एक पुरुष व दोन महिला यांनाही पकडले. त्यांची नावे शाईन बानो अबु हमजा, रुबीना हबीब कुरैशी, सिद्धार्थ कैलास रायमाळे अशी असल्याचे समोर आले. पोलिसांनी जफर खाटीककडून बॅग पैशांसह जप्त केली. प्रत्येकाकडून एक असे ६ मोबाइल जप्त केले. त्यांची कारही जप्त करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल शिंदे करत आहेत. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना

Latest News

लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना लस्सी उधार न दिल्याने टवाळखोरांनी तरुणाला केली बेदम मारहाण, सातारा परिसरातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उधारीत लस्सी न दिल्याने ३ टवाळखोरांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुण जखमी झाला....
हिंदू मुलींना फसवण्यासाठी विशिष्ट समुदायाकडून पैसे दिले जातात!; छत्रपती संभाजीनगरमध्ये जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे स्पष्ट मत 
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध डॉक्टरकडून खंडणी स्वीकारताना तिघे अटकेत!; खऱ्या नोटांऐवजी पोलिसांनी दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा... हडको एन १२ मध्ये सिटी चौक पोलिसांच्या कारवाईने खळबळ 
Jyotish : घरात गायीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी? अशा प्रकारे मूर्ती ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येईल...
इंडक्शन कुकर किंवा सिलिंडर मिळत नसेल, तर कमी किमतीत तुमचे जेवण शिजवण्यासाठी वापरा हे गॅझेट्स...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software