Political Exclusive : राजकारणात नवखे असले तरी बंधू आ. बोरनारेंचे पाठिशी बळ, घराणेशाहीच्या टीकेवर मात करून संजय बोरनारे घडवतील इतिहास?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वैजापूर नगरपालिकेवर २५ वर्षे वर्चस्व राखणाऱ्या डॉ. दिनेश परदेशी यांच्यासमोर शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय बोरनारे हे नवखे असले तरी त्यांच्या पाठिशी आ. रमेश बोरनारे यांचे पाठबळ आहे. आ. बोरनारे यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना संधी देण्याऐवजी घरातच भावाला नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संधी दिली. त्यामुळे घराणेशाहीबद्दल टीका होत असताना, या टीकेवर मात करून संजय बोरनारे नगरपालिका ताब्यात घेऊन इतिहास घडवणार का, अशी चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. दिनेश परदेशी ३० वर्षांपासून राजकारणात आहेत. नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष अशी पदे त्यांनी पालिकेत भूषविली आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मोठी तयारी केली होती. मात्र वैजापूरची जागा शिंदे गटाला सुटल्याने आणि भाजपची शिंदे गटाशी महायुती असल्याने डॉ. परदेशी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली होती. ३० वर्षांपासून राजकारणात असल्याने आणि वेळोवेळी प्रत्येकासाठी धावून जाणारे नेते म्हणून ओळख असल्याने शहरात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना वैजापूर शहरात ३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते, हे विशेष. आता शिंदे गट स्वतंत्रपणे नगरपालिका निवडणूक लढवत आहे, तर भाजप- अजित पवार गटाची युती आहे. ठाकरे गटाकडूनही डॉ. परदेशी यांना छुपे सहकार्य होत असल्याची चर्चा आहे. याशिवाय शिंदे गटातील नाराज पदाधिकारीही डॉ. परदेशी यांच्याच बाजूने झुकलेले दिसत आहेत.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी डॉ. परदेशी यांनी जोरदार व्यूहरचना केली आहे. त्यामुळे ते आमदार बोरनारे यांचे छोटे भाऊ संजय बोरनारे यांना पराभूत करण्यात यशस्वी होतात, की संजय बोरनारे हे इतिहास घडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय बोरनारे हे डॉ. परदेशी यांच्या तुलनेत राजकारणात नवखे आहेत. याशिवाय कार्यकर्ते, पदाधिकारी वाऱ्यावर सोडून सर्व पदे घरातच घेण्याचा आ. बोरनारे यांचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होत आहे. या दोन गोष्टींवर संजय बोरनारे कसे मात करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मविआ एकसंध
वैजापूरमध्ये महाविकास आघाडी एकसंध दिसून येत आहे. भाजप- शिंदे गटाच्या भांडणात संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी सुभाष गायकवाड यांना उभे केले आहे.  विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा एक प्रभावी गट डॉ. परदेशी यांच्या पाठिशी होता, तो याही निवडणुकीत पाठिशी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची झुकलेली भूमिका आणि अलीकडेच मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये झालेले प्रवेश या जमेच्या बाजू आहेत.

शिंदे गटाच्या नेत्याची खुमखुमी...
स्वतंत्र निवडणूक लढवत असताना समोर मित्र पक्ष आहे, विरोधक नाही, हे लक्षात ठेवूनच निवडणूक लढायची, असे भलेही भाजपने ठरवले असेल, पण शिंदे गटाच्या नेत्यांची खुमखुमी वारंवार समोर येत आहे. खुलताबादमध्ये शिंदे गटाचे सहसंपर्कप्रमुख माजी आमदार आण्णासाहेब माने यांनी रविवारी (२३ नोव्‍हेंबर) प्रचारादरम्यान भाजपाला धडा शिकविण्याची भाषा केली. नगर परिषद निवडणुकीत खुलताबादमध्ये भाजपा, अजित पवार गट, शिंदे गट हे महायुतीतील मित्रपक्ष आमनेसामने ठाकले आहेत. भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी परसराम बारगळ, शिंदे गटाकडून बाबासाहेब बारगळ आणि अजित पवार पक्षाकडून माजी नगराध्यक्ष हाजी अकबर बेग मैदानात आहेत. या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटात प्रमुख लढत मानली जात आहे. अण्णासाहेब माने आक्रमकपणे भाजपवर टीका करत आहेत. त्यांचा राग प्रामुख्याने आ. प्रशांत बंब यांच्यावर आहे. तो या निवडणुकीत ते काढताना इतके विसरले आहे, राज्यात आपण भाजपसोबत सत्तेत आहोत, याचाही विसर त्यांना पडला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेताना माने यांनी भाजपच्या स्वार्थीपणामुळे महायुती झाली नसल्याचे टीकास्त्र सोडले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software