- News
- पॉलिटिक्स
- मी पॅकेजचं समर्थन करतो, फक्त तुम्ही... उद्धव ठाकरेंनी सरकारपुढे ठेवला पर्याय!; छ. संभाजीनगरात ठाकर...
मी पॅकेजचं समर्थन करतो, फक्त तुम्ही... उद्धव ठाकरेंनी सरकारपुढे ठेवला पर्याय!; छ. संभाजीनगरात ठाकरे गटाचा हंबरडा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एका अटीवर राज्य सरकारच्या ३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टर ‘मनरेगा’तून ३५० लाख रुपये देणार. मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, दिवाळीपूर्वी त्या साडेतीन लाखांतील एक लाख शेतकऱ्यांच्या खात्यात टाका. बाकीचं आपण नंतर बघू, अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
शेतकऱ्याचे जीव उद्ध्वस्त झालंय. जमीन खरडून गेलीये, तुम्ही रब्बीचं पिक घेणार कसं? ५० हजार आम्ही का मागत आहोत, त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा की जमिनीची अवस्था काय झाली आहे. मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होतात. आता मी तुमची नियत काढतो, असे शरसंधान ठाकरेंनी डागले. तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांची मते पाहिजेत. शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही सरकार आणता. शेतकऱ्याने न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं? हे कुठले सरकार आहे?, असा सवाल त्यांनी केला. "राजा उदार झाला, हाती काय दिला... भोपळा... आता येता येता एका शेतकऱ्याने सांगितलं की, साहेब हाती टरबूज दिलं. राजा उदार झाला आणि हातात काय दिलं टरबूज. ही शेतकऱ्यांची थट्टा चालली आहे, असे ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेत्याला एक अधिकार असतो. तो अधिकाऱ्यांना बोलावून विचारू शकतो की, अरे पॅकेज जाहीर केलंय, काय केलंस? तो विरोधी पक्षनेताच तुम्ही द्यायला तयार नाहीत. का तर संविधानात तशी तरतूद नाही. मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद मला दाखवा नाहीतर, तुमचे दोन हाफ, त्यांना हाफच राहूद्या. त्यांना उपमुख्यमंत्री आम्ही मानू शकत नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला. मोर्चात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, खा. ओमराजे निंबाळकर, खा. अरविंद सावंत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ.अंबादास दानवे, आ. कैलास पाटील, माजी आमदार उदयसिंह राजपूत, ज्योती ठाकरे, राजू वैद्य, सचीन घायाळ, सुनीता आऊलवार, सुकन्या भोसले, राजू दानवे, संतोष खेंडके आदींसह शिवसेनेचे मराठवाड्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी, कार्यकर्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व अन्नाच्या पाकिटाची व्यवस्था करण्यात आली होती. मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांना कार्यालयात जाऊन देण्यात आले. या वेळी पक्षाचे महानगर प्रमुख राजू वैद्य, उपनेते सचिन घायाळ, एकनाथ नवले यांची उपस्थिती होती.
खासदार भुमरेंवर खैरेंची टीका
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खासदार संदिपान भुमरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की माझ्याविरोधात निवडणूक लढताना भुमरे यांनी १२० कोटी रुपये वाटले. ५ हजार रुपये मतांप्रमाणे पैसे वाटले. दारू विकतो हा माणूस. २२ दारूच्या दुकाना आहेत. हा शेतकऱ्यांना दारू पाजून उद्ध्वस्त करतो. याचा मुलगा बोललाच ना, मी २० हजार मते बाहेरून आणली. नंतर मला कळलं की, खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, अरे बाबा त्याला गप्प बसवा म्हणून. असे हे बाप-लेक आहेत. आता जनता चिडलेली आहे. प्रचंड चिडलेली आहे. या निवडणुकीत त्यांना सरळ करणार, असा इशाराही खैरे यांनी दिला.
हे भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक, दानवेंचा भुमरे, शिरसाटांवर आरोप
आ. अंबादास दानवे यांनी यावेळी मंत्री शिरसाट आणि खासदार संदिपान भुमरे यांच्यावर शरसंधान साधले. ते म्हणाले, की भुमरे यांनी वाहन चालकाच्या नावावर दीडशे कोटी रुपयांची मालमत्ता घेतली. ते आमच्याशी काय बोलणार. मुंबईत ७२ व्या मजल्यावर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ हजार स्क्वेअर फुटांत बंगला बांधणारे शिरसाट आमच्याशी काय बोलणार आहेत. त्याला नैतिकता लागते. हे भ्रष्टाचाराने बरबटलेले लोक आहेत, असा घणाघात दानवे यांनी केला.
शेतकरी कशाला राजकारण करेल?, शेतकरी कोळींचा सवाल
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औसा येथील भूषण कोळी या शेतकऱ्याने शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रश्न केला असता फडणवीस यांनी ये बाबा इकडे राजकारण करू नकोस, असे सुनावले होते. नंतर कोळी यांना पोलिसांनी घेतले होते. हंबरडा मोर्चात कोळी सहभागी झाले होते. त्यांनी संतप्त भावना व्यक्त केली. शेतकरी कशाला राजकारण करेल?, असा सवाल त्यांनी केला. आतापर्यंत बोललेली एकही गोष्ट या सरकारने केली नाही. ओला दुष्काळ जाहीर करता येत नसल्याचे आता म्हणत आहेत. पाहणी करायला आल्यानंतर तेव्हा रोडच्या खाली देखील उतरले नाहीत. त्यामुळे शेतामध्ये काय चाललंय, किती आणि काय नुकसान झाले हे त्यांना काय समजणार, असा सवाल कोळी यांनी केला. हेक्टरी किती मदत देणार आहात, सगळ्यांसमोर ती मदत जाहीर करा, तर मला मुख्यमंत्री म्हणाले राजकारण करू नकोस. शेतकरी कशाला राजकारण करेल? राजकारण ते करत आहेत, असा उद्वेगही कोळी यांनी व्यक्त केला.

