- News
- पॉलिटिक्स
- पत्रिकेत नावे खंडीभर, पण एकही राजकीय नेता आला नाही… अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन मंत्री सत्तारा...
पत्रिकेत नावे खंडीभर, पण एकही राजकीय नेता आला नाही… अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन मंत्री सत्तारांनी टाकले उरकून!, नक्की असं का घडलं वाचूया बातमीत…
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : हज हाऊस येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बुधवारी (दि.२६) सायंकाळी झाले. या सोहळ्याला शिंदे गट, भाजपासह काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरविल्याने बराच वेळ वाट पाहून मंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन उद्घाटन उरकले. काँग्रेसने दोन दिवसांपासून या कार्यक्रमाला विरोध केला होता. […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : हज हाऊस येथे अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बुधवारी (दि.२६) सायंकाळी झाले. या सोहळ्याला शिंदे गट, भाजपासह काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरविल्याने बराच वेळ वाट पाहून मंत्री सत्तार यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन उद्घाटन उरकले. काँग्रेसने दोन दिवसांपासून या कार्यक्रमाला विरोध केला होता.

महायुती सरकारने अलीकडेच अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हे आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरातच हवे, असा हट्ट मंत्री सत्तार यांनी धरला. आयुक्तालयातील तब्बल ८६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेश जागा मिळेल अशी जागा सापडत नव्हती. अखेर हज हाऊसची इमारत निवडण्यात आली. अगोदरच या इमारतीत वक्फ ट्रिब्यूनल (कोर्ट) आणलेले आहे. त्यातच आता आयुक्तालयही आणल्याने काँग्रेस, ठाकरे गटाने विरोध केला.
कार्यक्रम पत्रिकेत खा. कल्याण काळे यांचे नावही नव्हते. उद्घाटनापूर्वी काही वेळ अगोदर कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव टाकण्यात आले. सायंकाळी चारला उद्घाटन होणार होते. पाच वाजले तरी एकही नेता फिरकला नाही. अधिकारी, कार्यकर्ते ताटकळल्याने सत्तार यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना सोबत घेऊन कोनशिला अनावरण करून टाकले.
कार्यक्रम पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री संदीपान भुमरे, प्रमुख पाहुणे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, वक्फचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, खा. भागवत कराड, खा. फौजिया खान, खा. डॉ. कल्याण काळे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. उदयसिंग राजपूत यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांची नावे होती. मात्र सर्वच राजकीय पक्षांचे नेते गैरहजर राहिले.
काँग्रेसने केले आंदोलन…
काँग्रेसने हज हाऊस के सन्मान में, काँग्रेस मैदान में अशा घोषणा देत निदर्शने केली. यावेळी शहराध्यक्ष शेख युसूफ व अन्य ७० निदर्शकांना पोलिसांनी अटक केली. अल्पसंख्याक आयुक्तालयाचे स्वागतच आहे, पण ते हज हाऊसमध्ये नको, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन बेगमपुरा पोलीस ठाण्यात नेले. कार्यक्रम स्थळाकडे जायचे नाही, अशी समज देऊन सर्वांना सोडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयुक्तालय अल्पसंख्याकांच्या सर्वांगिण विकासासाठी सहाय्यभूत ठरेल : मंत्री अब्दुल सत्तार
अल्पसंख्याक आयुक्तालय हे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या शिक्षण, रोजगारासह सर्वांगिण विकासासाठी कार्य करेल, असा विश्वास अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अल्पसंख्याक आयुक्त मोईन ताशिलदार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री सत्तार म्हणाले, की देशातील पहिले अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजी नगर येथे होत असून या आयुक्तालय अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणी,पाठपुरावा करून त्यांना वेळीच लाभ देणे शक्य होईल. अल्पसंख्याक आयुक्तालयामुळे अर्जदाराच्या अर्जावर तात्काळ कारवाई होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद मदत होईल. अल्पसंख्याक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी हे एक विभाग कार्य करणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले.

