- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- कोट्यवधींचा गौणखनिज उत्खनन घोटाळा? छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव शिवारातील धक्कादायक प्रकरण स...
कोट्यवधींचा गौणखनिज उत्खनन घोटाळा? छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव शिवारातील धक्कादायक प्रकरण समोर!; महावितरणने दिलेल्या लाखो रुपयांच्या बिलामुळे पितळ उघडे
1.jpg)
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
छत्रपती संभाजीनगर : २०२२ साली एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गौणखनिज उत्खननासाठी तात्पुरते परवाने देण्यात आले नव्हते. तरीही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील नायगाव शिवारात सर्रास अवैध उत्खनन सुरू होते. तिथल्या ३ कंपन्यांच्या क्रेशर कायम धडधडत होत्या. याचे पुरावे म्हणजे, महावितरणने या ७ महिन्यांत या कंपन्यांना दिलेली लाखो रुपयांची बिले. आता ही बाब एका सामाजिक कार्यकर्त्याने समोर आणल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा अवैध गौणखनिज उत्खनन घोटाळा समोर येण्याची शक्यता आहे.

७ महिन्यांत कोणत्या कंपनीला किती बिल?
कंपनी क्रमांक १ : ७० लाख ३५ हजार १२६ रुपये
कंपनी क्रमांक २ : ४९ लाख ४५ हजार ८१७ रुपये
कंपनी क्रमांक ३ : ३४ लाख ३९ हजार ४२९ रुपये
तिघांचे मिळून सहा ठिकाणी उत्खननाचा आरोप
मनाई असलेल्या काळात तिन्ही क्रेशर कंपन्यांनी नायगाव येथील गट क्र. १०७ मधील मोगदरा आणि गवंदरा खोऱ्यातील डोंगरे पोखरून करोडो रुपयांच्या गौणखनिजाचे उत्खनन केले आहे. तिघांनी मिळून सहा ठिकाणी उत्खनन केले. यात ब्लास्टिंग करून पर्यावरणाला मोठी हानीही पोहोचविण्यात आली आहे. याला महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची साथ असल्याचा संशय असून, या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी. तिन्ही कंपन्यांकडून केलेल्या उत्खननाबद्दल दंड वसूल करावा, अशी मागणी नायगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील शेख मुश्ताक अजीज यांनी केली आहे.