- News
- एक्सक्लुझिव्ह
- गंगापूर विधानसभा निवडणूक : आ. प्रशांत बंब यांच्याविरुद्ध षड्यंत्र?
गंगापूर विधानसभा निवडणूक : आ. प्रशांत बंब यांच्याविरुद्ध षड्यंत्र?
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या गंगापूर मतदारसंघात चौथ्यांदा विजयाची तयारी करणारे भाजप उमेदवार आ. प्रशांत बंब यांना या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यामुळे पहिल्यांदाच तुल्यबळ आव्हान मिळाले आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, गावागावात जनसंपर्क, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने मतदारसंघात मोठा निधी आणण्यात आलेले यश आणि झालेली विकासकामे या जोरावर आजवर बंब […]
गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : विधानसभेच्या गंगापूर मतदारसंघात चौथ्यांदा विजयाची तयारी करणारे भाजप उमेदवार आ. प्रशांत बंब यांना या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यामुळे पहिल्यांदाच तुल्यबळ आव्हान मिळाले आहे. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, गावागावात जनसंपर्क, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने मतदारसंघात मोठा निधी आणण्यात आलेले यश आणि झालेली विकासकामे या जोरावर आजवर बंब यांनी तिन्ही टर्म यशस्वी पार पडल्या, पण चौथी टर्म मिळवणे त्यांना इतके सोपे राहिलेले नाही. त्यांच्याविरुद्ध मतदारसंघात मोठेच षड्यंत्र रचले जात असल्याचे सलग तिसऱ्या घटनेमुळे शिक्कामोर्तब झाले आहे. प्रत्येक गावात विघ्नसंतोषी असतातच, त्यांना हाताशी धरून बंब यांच्याविरोधात घोषणा द्यायला लावायच्या. त्यांना आवरायला सरसावलेल्या गावातील काही लोकांविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दाखवायचे आणि बंब यांच्या अडचणी वाढवायच्या, जेणेकरून बंब यांच्याविरुद्ध मोठा जनरोष असल्याचे चित्र समोर येईल, अशी खेळी मतदारसंघात खेळली जात असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

वेरूळ येथे प्रचार सभेत आ. बंब आणि ग्रामस्थांत वाद झाल्याचे रंगविण्यात आले. वास्तवात ग्रामस्थ नव्हे तर गावातील एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हे कृत्य होते, हे नंतर समोर आले. त्याला गावाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न जाणूनबुजून का घडला हा संशोधनाचा विषय आहे. तसाच प्रकार सालूखेडा येथेही घडविण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्याचे बिरुद चिकटवून समाजात वावरणारी ही वाद घडवून आणणारी मंडळी असे का आणि कुणासाठी करत आहे, हे समोर यायला हवे, अशीही चर्चा होत आहे. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवऱ्यात तर वेगळाच प्रकार घडला. शुक्रवारी रात्री गवळी शिवऱ्यात बंब यांची सभा होती. चार-पाच तरुणांनी बंब यांना जाब विचारला. बंब हे त्यांना उत्तर देत असताना त्यातील एका तरुणाने बोलण्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बंब चिडले. हे चित्र पाहून गावातीलच बंब यांचे समर्थक कार्यकर्ते त्या तरुणांवर चिडले. यातून कार्यकर्ते आणि त्या तरुणांत हाणामारी सुरू झाली. तरुणांच्या नातेवाइकांनीही त्यात भाग घेतला. अखेर बंब यांना सभा सोडून जावे लागले.
सलग एकाच स्वरुपाच्या घटना बंब यांच्यासोबत घडत असल्याने त्या घडवल्या जात असल्याचा संशय मतदारसंघात व्यक्त होत आहे. यामागे कोण आहे, याबद्दलही चर्चा घडताना दिसत आहे. बंब यांचा मतदारसंघातील अभ्यास, गावागावात समर्थक कार्यकर्त्यांची फळी, नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक उमेदवार असणे या जमेच्या बाजू आहेत. त्या तुलनेत सतीश चव्हाण हे बाहेरचे उमेदवार ठरतात. बंब हे स्थानिक असल्यामुळे कार्यकर्ते, ग्रामस्थांसाठी कायम उपलब्ध असतात. सतीश चव्हाण यांचा जनसंपर्क आणि त्यांना मतदारसंघाच्या विकासाची जाण या गोष्टी तुलनेने कमी पडतात. बंब यांच्याविरुद्ध चार-दोन विघ्नसंतोषींना पुढे करून अवघे गाव बंब यांच्याविरुद्ध असल्याचे दाखविण्याची जी खेळी खेळली जात आहे, ती चव्हाण यांच्या पथ्यावर पडू लागली आहे, अशी चर्चा होत आहे. बंब आणि चव्हाण यांच्याशिवाय मतदारसंघात बसपाचे सतीश तेजराव चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे अनिल चंडालिया यांनीही लढाईत रंगत आली आहे.

