सिल्लोडमध्ये पुन्हा सत्तारांची घराणेशाही!; मुलगाच होणार तिसऱ्यांदा नगराध्यक्ष

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सिल्लोड नगरपरिषदेवर आरक्षणाचा अपवाद वगळता कायम घराणेशाहीचा वरचष्मा ठेवणारे आमदार अब्‍दुल सत्तार याहीवेळी आपल्या मुलाला नगराध्यक्ष करणार आहेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आ.सत्तार यांनी या पदासाठी आपला मुलगा अब्दुल समीर यांना पुढे केल्याने शिंदे गटात स्थानिक पातळीवर नाराजांचा वर्ग तयार झाला आहे.

सत्तारांनी आपला पुत्रच नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल, असे घोषित करतानाच त्यांच्या मिर्झा कॉलनी, भारतनगर व जामा मशीद परिसरातील प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटनही सोमवारी (२० ऑक्‍टोबर) दुपारी उरकले. यापूर्वी अब्दुल समीर हे दोनदा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. सिल्लोड नगरपालिकेवर ३० वर्षांपासून आ. अब्दुल सत्तार यांचे वर्चस्व असून, २०१९ मध्ये आ.सत्तार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने २६ पैकी २४ जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने केवळ दोन जागांवर विजय मिळविला होता.

त्यावेळी नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी सुटले होते. यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहिल्याने अब्दुल समीर यांच्या नावाची घोषणा सत्तार यांनी करून टाकली. सिल्लोडमध्ये आधी काँग्रेस, नंतर शिवसेना आपल्याच भोवती फिरत राहील, याची दक्षता सत्तारांनी घेतल्याचे आजवर दिसून आले आहे. आरक्षणामुळे अन्य कार्यकर्ते, नेत्यांना उच्च पदावर संधी मिळते, पण एरवी सत्तारांची घराणेशाही कायम राहते, अशी खदखद शिंदे गटातील नेते, कार्यकर्त्यांतून व्यक्‍त होत आहे. शिंदे गटाच्या अन्य नेत्‍यांनी केवळ कार्यक्रमांत पदाधिकारी असल्याचेच समाधान मानत राहायचे का, असा प्रश्न केला जात आहे.

नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार : आ. सत्तार
मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेले काही दिवस राजकीय विजनवासात राहिलेले आ. अब्‍दुल सत्तार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे पुन्हा सक्रीय झाले आहेत. सिल्लोड नगरपरिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील, त्यामुळे कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे ते म्हणाले. अब्‍दुल समीर यांच्या प्रचार कार्यालयांच्या उद्‌घाटनावेळी शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, नंदकिशोर सहारे, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, माजी नगराध्यक्षा राजश्री निकम, दामूअण्णा गव्हाणे, शहरप्रमुख मनोज झंवर, रउफ बागवान, विठ्ठल सपकाळ, आसिफ बागवान, शंकरराव खांडवे, चांद बेग मिर्झा, सुधाकर पाटील, रईस मुजावर, शेख सलीम हुसेन आदी उपस्थित होते.

भाजप सत्तापरिवर्तन घडविण्याच्या मूडमध्ये
सत्तारांविरोधात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उघड उघड काम केले होते. सिल्लोड नगरपालिका निवडणुकीत भाजपची काय भूमिका असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर शिंदे गटासोबत युती करण्याच्या मूडमध्ये भाजप पदाधिकारी नाहीत. त्‍यामुळे भाजप स्वतंत्र लढली तर सत्तारांच्या हातून पालिका काढून घेण्याची तयारी आतापासूनच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्‍यादृष्टीने व्यूहरचना आखली जात आहे. त्‍यामुळे ही निवडणूक सत्ताधारी आणि विरोधक अशी न होता शिंदे गट विरुद्ध भाजप अशीच होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ

Latest News

छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी;गुरुवारपासून होणार प्रारंभ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहर व जिल्ह्यात मुस्लिम बांधवांची संख्या मोठी आहे. मुस्लिम बांधवांसाठी पवित्र मास म्हणून ओळखल्या...
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
जमिनीच्या वादातून सेवानिवृत्त वनअधिकाऱ्याचे भरदिवसा अपहरण करून लुटले, ७ तास धरले वेठीस, छत्रपती संभाजीनगरची खळबळजनक घटना
सिल्लोडजवळ २ भीषण अपघात : अज्ञात वाहनाची कारला मागून धडक, एकाचा मृत्‍यू; मका नेणारा ट्रक उलटून चालक जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software