पाचोडमध्ये टवाळखोरांचा कहर : चौकात वाढदिवसासाठी डीजे लावला, नंतर नागरिकांची वाहने जाळली!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पाचोडमध्ये टवाळखोरांनी पुन्हा धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी (२४ डिसेंबर) रात्री तर त्यांनी कहरच केला. वाढदिवसासाठी चौकात कर्णकर्कश आवाज डीजे लावला. रात्रभर धिंगाणा घालत असताना पहाटे तीनला रहिवाशांची वाहने पेटवून दिली. यात वाहनांचे ५६ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पाचोड पोलिसांनी १३ टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मीराबाई वैजीनाथ काळे (वय ३७, रा. कल्याणनगर पाचोड ता. पैठण) यांनी याप्रकरणात तक्रार दिली. बुधवारी (२४ डिसेंबर) रात्री ८ च्या सुमारास त्या नेहमीप्रमाणे त्यांची स्कुटी (MH 20 BH 1841) घरासमोर उभी करून झोपी गेल्या होत्या. कल्याणनगर चौकात शाहरुख शब्बीर शेख याचा वाढदिवस असल्याने तेथे डीजे वाजण्याचा जोरात आवाज येत होता. त्यामुळे मीराबाई यांनी घराबाहेर येऊन शारुख शब्बीर शेख, आदेश उर्फ लल्या हरीचंद्र नेमाने, विठ्ठल बापू एखंडे, बबू फिरोज पठाण, अतुल दत्ता हिवाळे, अरबाज फिरोज शेख, सर्फराझ शेख, सागर मोरे, दा‌द्या उर्फ शुभम मुंजाळ, ओमकार धनवट (सर्व रा. कल्याणनगर पाचोड), कुणाल हरीचंद्र म्हस्के (रा. शिवाजीनगर, पाचोड), अलीम पठाण, कल्लू खलील शेख (दोन्ही रा. इस्लामपुरा पाचोड) हे धिंगाणा घालत होते. त्यांना मीराबाई यांनी डीजेचा आवाज कमी करा. लोकांना त्रास होत आहे, असे समजावून सांगितले.

त्यावर तरुणांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मीराबाई घरात जाऊन झोपी गेल्या. गुरुवारी (२५ डिसेंबर) पहाटे तीनच्या सुमारास त्या झोपेतून उठल्या असता घरासमोर लावलेली स्कुटी दिसली नाही. त्या स्कुटी शोधत कल्याणनगर चौकात आल्या असता तिथे आदेश उर्फ लल्या हरीचंद्र नेमाने, बबु फिरोज पठाण, विठ्ठल बापू एखंडे व अतुल दत्ता हिवाळे हे काहीतरी पेटवून देत होते. मीराबाईंना पाहून ते पळून गेले. मीराबाई यांनी जवळ जाऊन पाहिले असता आगीत त्यांची स्कुटी दिसली. सुनिल दत्तात्रय भुमरे यांची सायकल व फायबर खुर्ची व शेख बाबुलाल महम्मद यांची लोखंडी बाज व दीपक चांदणे यांची मोटारसायकल जळताना दिसत होती. यात एकूण ५६ हजार ५०० रुपयांचे नुकसान टवाळखोरांनी केले हाते. मीराबाई यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी १३ टवाळखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अण्णासाहेब गव्हाणे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मंदिरात गुप्तपणे दान करा ‘या’ ५ गोष्टी‌! तुमची संपत्ती वाढते...

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software