- News
- जिल्हा न्यूज
- फुलंब्रीतील प्रकरण : गावातील महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध, हेही बहिणीच्या आत्महत्येचे एक कारण, भाव...
फुलंब्रीतील प्रकरण : गावातील महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध, हेही बहिणीच्या आत्महत्येचे एक कारण, भावाचा तक्रारीत गंभीर आरोप!; वाणेगावच्या सुनिताच्या ‘पीएम रिपोर्ट’मध्ये काय समोर आले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाणेगाव (ता. फुलंब्री) येथील सुनिता अण्णा भोकरे (वय ३१) या विवाहितेचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा उत्तरीय तपासणी अहवाल फुलंब्री पोलिसांना प्राप्त झाला. त्यानंतर सुनिता यांचे भाऊ गजानन शिवाजी गवळी (वय ३७, रा. मोढा खुर्द ता. सिल्लोड) यांनी तिच्या पती व सासरच्या मंडळीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिचा पती अण्णा, सासरा राजाराम, सासू मनुबाई, जाऊ गंगूबाई संतोष भोकरे (तिघे रा. वाणेगाव), नंदोई भागीनाथ गायकवाड व राजू कारले (दोघे रा. गणोरी, ता. फुलंब्री) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनिताच्या पतीचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाला सुनिता विरोध करत होती. त्यामुळे तो तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. हेही एक कारण आत्महत्येमागे असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मंगळवारी (१३ जानेवारी) सकाळी सुनिताचे सासू- सासरे, जाऊ विरमगाव येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. दुपारी २ ते ३ च्या सुमारास सुनीता घराबाहेर पडल्या होत्या. सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र शोध लागला नव्हता. दुसऱ्या दिवशी बुधवारी (१४ जानेवारी) सकाळी राहत्या घरासमोरील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणला. सुनिताच्या आत्महत्येची माहिती तिच्या माहेरी कळविण्यात आली. त्यानंतर मोठ्या संख्येने नातेवाइक फुलंब्री पोलीस ठाण्यासमोर जमले होते. सासरच्यांनीच हत्या केल्याचा आरोप त्यांनी करत ‘इन-कॅमेरा' शवविच्छेदनाची मागणी केल्याने मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांनी थेट फुलंब्री पोलीस ठाण्यात आणला. सासरच्यांना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. या वेळी पोलिसांना दंगा काबू पथकाला पाचारण करावे लागले होते. संशयितांना ताब्यात घेतल्याचे व्हिडीओ कॉलद्वारे दाखविल्यानंतर नातेवाइक शांत झाले होते. यानंतर बुधवारी रात्री ११:३० वाजता वाणेगाव येथे सुनीता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

