- News
- सिटी डायरी
- ‘उच्च’ उत्पन्न पण ‘अल्प’ सुविधाही नाही... वडगाव कोल्हाटी ग्रा. पं.विरोधात महिलांचे उपोषण सुरू, गैरक...
‘उच्च’ उत्पन्न पण ‘अल्प’ सुविधाही नाही... वडगाव कोल्हाटी ग्रा. पं.विरोधात महिलांचे उपोषण सुरू, गैरकारभाराच्या चर्चेने पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीत असल्याने प्रचंड उत्पन्न असूनही वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा पुरवण्यात अपयशी ठरली असून, याला कारणीभूत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा संगणमताने सुरू असलेला गैरकारभार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रदीर्घ काळापासून वीज, पाणी आणि ड्रेनेज समस्येला घेऊन गट क्रमांक ९ मधील महिला ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवत आहेत. दरवेळी आश्वासने देऊन वेळ मारून नेणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि गैरव्यवहाराने बरबटलेल्या वृत्तीमुळे अखेर या महिलांना उपोषणाचे अस्त्र उपसावे लागले. आज, ११ डिसेंबरपासून या महिला उपोषणाला बसल्या आहेत. पहिल्याच दिवशी ३० ते ३५ महिलांनी सहभाग घेत, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आता उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. महिलांच्या आंदोलनामुळे पितळ उघडे पडल्याने पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

