मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हायवाचालकाने रिव्हर्स घेताना मागे न पाहताच दुचाकीस्वार १८ वर्षीय तरुणीला चिरडले. उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात बुधवारी (१८ मार्च) सकाळी तिचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर शहराजवळील चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरापूर शिवारात मंगळवारी (१७ मार्च) सकाळी ११ वाजता घडली. तरुणीच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी महापारेषणसह हायवाचालकावर कारवाईसाठी तीन तास चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला.

मनस्वी विजय गाडगे (वय १८, रा. कॉपर व्हाइट सोसायटी, पीएसबीए शाळेजवळ, हिरापूर शिवार, छत्रपती संभाजीनगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिचे वडील खासगी हॉटेलमध्ये व्यवस्थापक असून, सध्या आजारी पडल्याने त्यांच्यावर चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन मंगळवारी सकाळी मनस्वी दुचाकीने आई व बहिणीसह रुग्णालयाकडे निघाली होती. मध्येच आईला चक्कर आल्याने दुचाकी तिने रस्त्याच्या बाजूला घेत थांबवली. तेथेच महापारेषणच्या हायहोल्टेज तारा टाकण्यासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खड्डे खोदलेले असून, मुरुम टाकण्यासाठी थांबलेल्या हायवाचालकाने मागचा अंदाज न घेता हायवा वेगात मागे घेत थेट मनस्वीच्या अंगावर घातला. यात तिची आई बाजूला फेकली गेली तर मनस्वीचा कंबरेखालच्या भागाला गंभीर दुखापत झाली.

नागरिकांनी तातडीने धाव घेऊन मनस्वीला हिरापूरपासून ११ किलोमीटर अंतरावरील चिश्तिया चौकातील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे उपचारांना उशीर असल्याने तातडीने तिला घाटी रुग्णालयात आणले. यात उपचारांना विलंब होऊन मनस्वीची प्रकृती अधिकच बिघडली आणि बुधवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. मनस्वी बारावीची परीक्षा देऊन सीईटीची तयारी करत होती. ती अभ्यासात हुशार होती. तिला एक लहान बहीण आहे. मनस्वीच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाइकांसह नागरिकांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. ३ तास आंदोलन चालल्यानंतर सायंकाळी हायवाचालक, महापारेषण व महापारेषणच्या कंत्राटदाराविरुद्ध मनस्वीच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस अंमलदार सुनील सुरासे करत आहेत.

हायवावरील क्रमांक खोडलेला
मनस्वीच्या मृत्यूला कारणीभूत हायवावरील क्रमांक खोडलेला आहे. शासकीय काम असताना असा क्रमांक खोडलेल्या हायवाचा वापर केला गेल्याने अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. या भागात या भागात खासगी बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, हायवा व सिमेंट मिक्सरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे लहान वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते. ते थोडीही साईड देत नाहीत. वाहन बाजूला घेऊन थांबावे लागते. विशेष म्हणजे, यातील बहुतांश सिमेंट मिक्सर, हायवा विनाक्रमांकाचे असतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

Latest News

शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शहरासह जिल्ह्याला ‘अवकाळी’चा तडाखा!; गहू, हरभरा,  मका, कांद्याचे १०० टक्के नुकसान, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हिंदू नववर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. बुधवारी (१८ मार्च)...
मागे न पाहताच रिव्हर्स घेणारा हायवा ठरला १८ वर्षीय मनस्वीचा काळ!; रुग्णालयात वडिलांना डबा घेऊन जात होती, चिकलठाण्याजवळील दुर्दैवी घटना
ब्रिजवाडी जमीन गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक गठीत, तीन महिन्यांत अहवाल सादर होणार, जिल्ह्यातील जमीन गैरव्यवहारांचीही होणार चौकशी
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-ब चाळणी परीक्षा २२ मार्चला; छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ हजार ६४० उमेदवार देणार परीक्षा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software