- News
- सिटी क्राईम
- लाडकी, कर्तव्यदक्ष ‘स्विटी’ गेली, छत्रपती संभाजीनगरचे अवघे शहर पोलीस दल हळहळले!, पहा शेवटच्या क्षणा...
लाडकी, कर्तव्यदक्ष ‘स्विटी’ गेली, छत्रपती संभाजीनगरचे अवघे शहर पोलीस दल हळहळले!, पहा शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अनेक मोठमोठ्या गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी, चाणाक्ष नजरेची अन् तीक्ष्ण कानांची, गुन्हेगारांवर आक्रमकपणे तुटून पडणारी पण तितकीच लाडाने पोलिसांच्या जवळ जाणारी...अशी ‘स्विटी’ श्वान आज, ३ नोव्हेंबरला पहाटे चार वाजून २० मिनिटांनी अवघ्या पोलीस दलाच्या जिवाला घोर लावून गेली... तिने अखेरचा श्वास घेतला अन् पोलिसांच्या हृदयाचा ठाव चुकला...
पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी व्यक्त केलेल्या संवेदना स्विटीबद्दल बरेच काही सांगून जातात. श्री. हिरेमठ म्हणले, की स्विटी ही आपुलकी, निष्ठा आणि सेवाभाव यांचे जिवंत प्रतीक होती. पोलीस दलातील एक विश्वासू, समर्पित आणि कर्तव्यदक्ष श्वान म्हणून तिने अनेक महत्त्वपूर्ण मोहिमांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी कामगिरी बजावली आहे...
काही दिवसांपूर्वीच स्विटीचे परभणी येथे गर्भपिशवीचे ऑपरेशन झाले होते. काल दुपारी ४ नंतर तिची प्रकृती गंभीर बनली होती. श्वान हँडलर एम. एम. तनपुरे खूप चिंतित होते. त्यांनी तिच्या आवडीचे खाद्यपदार्थही तिला देऊ केले. पण तिने खाल्ले नाहीत, असे श्री. तनपुरे म्हणाले. ८ वर्षे ११ महिने १५ दिवस इतके स्विटीचे वय होते.

