१६ वर्षांच्या मुलाच्या हाती कारचे स्टेअरिंग, सिटी चौक-उत्तम मिठाई रोडवर धडामधूमऽऽ, १ जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अल्पवयीनांच्या हाती दुचाकी वाहने देणारे पालक कमी नाहीत. पण आता चक्क कारचे स्टेअरिंग एका पालकाने आपल्या १६ वर्षांच्या दिवट्याच्या हाती दिले. मग हा दिवटा सुसाट कार घेऊन निघाला आणि सिटी चौक ते उत्तम मिठाई रोडवर आधी एकाला उडवल्यानंतर पुढे काही मोटारसायकलींना धडक देऊन थांबला. हा थरार प्रसंग गुरुवारी (१८ डिसेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने रस्‍त्‍यावर गर्दी नव्हती. अन्यथा मोठीच जीवितहानी झाली असती.

अशोक दामोधर भालेराव (वय ५२, रा. मोरे यांच्या पिठाच्या गिरणीजवळ हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते सवईवाला सोन्या चांदीचे दुकान सराफा रोड येथे वॉचमन आहेत. गुरुवारी (१८ डिसेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास उत्तम मिठाई ते सिटीचौककडे जाणाऱ्या रोडवर महाकाल फुल सेंटरसमोर अशोक भालेराव हे फुल खरेदी करत होते.  त्याचवेळी सिटीचौककडून उत्तममिठाईकडे सुसाट निघालेल्या हुंडाई I-20 कारने त्यांना उडवले. यात त्यांच्या हातापायाला व कमरेला मुक्का मार लागून उजव्या पायाला दुखापत झाली.

डाव्या पायाच्या गुडघ्याला मार लागला. कारने नंतर फुले खरेदीसाठी आलेल्या लोकांच्याही मोटरसायकली उडवल्या, नंतर कार थांबली. यात मोटरसायकलींचे नुकसान झाले. लोकांनी चालकाला कारबाहेर काढले असता सारेच थक्क झाले. कारण कार १६ वर्षांचा मुलगा चालवत होता. तो दलालवाडी पैठणगेट येथील असल्याचे त्या मुलाने सांगितले. महाकाल फुल सेंटरचे मालक बळीराम शत्रुघ्न सावंत यांनी अशोक भालेराव यांना सिटी चौक पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी भालेराव यांना मेडिकल मेमो देत घाटी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी कारचालक मुलासह त्याचे वडील आणि कारमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software