विवाहित मुलगी पतीचे घर सोडून मित्रासोबत गेली, तणावातून आईने केली आत्‍महत्‍या!; उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर कुटुंबीयांनी मृतदेह आणल्याने तणाव

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : उस्मानपुऱ्यात राहणारी २० वर्षीय विवाहित तरुणी बुलडाण्याच्या एका तरुणासोबत घरातून निघून गेली. तिच्या पतीने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दिली. पोलीस तिचा शोध असताना तरुणी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाली. स्वमर्जीने मित्रासोबत राहायला आली असून, कुटुंबाकडे परत न जाण्याचा जबाब तिने पोलिसांना लिहून दिला. त्यामुळे उस्मानपुरा पोलिसांचा नाइलाज झाला. मुलगी परत येत नसल्याचे कळल्याने तणावाखाली आलेल्या तिची आई रेखा राजू जाधव (वय ५०, रा. उस्मानपुरा) यांनी राहत्या घरात गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सायंकाळी ७ च्या सुमारास गळफास घेतला.

रेखा यांच्या आत्‍महत्‍येनंतर संतप्त कुटुंबाने मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठले आणि दोन तास ठिय्या दिला. अखेर रात्री सव्वा अकराला तरुणीला नेणाऱ्या वैभव बोर्डेसह पार्वती बोर्डे, विशाल बोर्डे (तिघे रा. रमानगर, छत्रपती संभाजीनगर), मनीषा पवार, नंदू पवार, राजेंद्र पवार (तिघेही रा. शास्त्रीनगर, बुलडाणा), गौरव बोर्डे, केसरबाई दगडू बोर्डे (रा. बदनापूर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेतला व पोलीस ठाणे सोडले.

तरुणीचे हे दुसरे लग्न होते. पहिले लग्न ३ वर्षांपूर्वी झाले होते. मात्र तिचा घटस्फोट झाला. गेल्या वर्षी या तरुणीचे दुसरे लग्न करवून देण्यात आले. मात्र ८ नोव्हेंबरला कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली होती. पोलीस तपासात ती वैभव बोर्डेसोबत बुलडाण्याला गेल्याचे समोर आले. उस्मानपुरा पोलिसांनी तिला परत आणण्यासाठी बुलडाणा गाठण्याआधी वैभव बोर्डे तरुणीसह बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. तेथे तरुणीने स्वमर्जीने वैभवसोबत आल्याचे व कुटुंबाकडे परत जाणार नसल्याचे लिहून दिले. विवाहित मुलीचे बोर्डे कुटुंबाकडून बरेवाईट होण्याच्या भीतीने तिची आई रेखा या तणावाखाली आल्या. मदतीची मागणी करण्यासाठी तरुणीचा भाऊ पोलीस आयुक्तालयात गेला असताना रेखा यांनी राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्रकारांशी बोलताना तरुणीचा भाऊ म्हणाला, की माझी बहीण वैभवसोबत बुलडाण्याला गेल्याचे उस्मानपुरा पोलिसांना सांगितले होते. त्यांना केवळ सोबत येऊन तिच्याशी आमचे बोलणे करून द्या, अशी विनंती केली होती. मात्र, पोलिसांनी गांभीर्याने घेतली नाही. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही मदत केली नाही. पोलिसांची वेळीच मदत मिळाली असती तर माझी आई वाचली असती, असा आरोप त्याने केला.

पोलीस ठाण्यासमोर जमाव...
उस्मानपुरा पोलीस बुलडाण्याला जाण्याआधीच तरुणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांना जबाब देऊन निघून गेली होती. कुटुंबाने रात्री आठला रेखा जाधव यांचा मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आणला. वैभव व त्याच्या कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करा, वेळेत कारवाई न करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. पोलीस ठाण्यातच मृतदेह ठेवल्याने तणाव निर्माण झाला. ठाण्याबाहेरही जमाव जमला. पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, गजानन कल्याणकर, कृष्णा शिंदे, सचिन कुंभार, अविनाश आघाव यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. दंगा काबू पथकालाही पाचारण केले होते. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आणि दोषी पोलिसांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह उचलत पोलीस ठाणे सोडले आणि तणाव निवळला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना

Latest News

अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना अपघातानंतर फार्मसिस्टला दुचाकीस्वारांची मारहाण, मोबाइल हिसकावून पळाले... चिकलठाण्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : अपघातानंतर स्कुटीस्वार फार्मसिस्टला दुचाकीवरील दोघांनी मारहाण केली आणि मोबाइल हिसकावून पळून गेले. ही घटना...
भरधाव ट्रकने दुचाकीला मागून ठोकरले, दाम्‍पत्‍यासह चिमुकली जखमी, वाळूज MIDC तील घटना
रांजणगाव शेणपुंजीत एमआयडीसीच्या जागेवर पुतळा, झेंडा, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुकुंदवाडीत चुकून धक्का लागल्याने दुचाकीस्वारावर चाकूचे वार!
छत्रपती संभाजीनगरातून ५ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाने खळबळ
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software