- News
- सिटी क्राईम
- कल्पनाला पैसे पाठवणाऱ्यांत हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचा समावेश!, सव्वा दोन लाख देणारे रमेश म...
कल्पनाला पैसे पाठवणाऱ्यांत हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांचा समावेश!, सव्वा दोन लाख देणारे रमेश मुळे कोण?
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) हिच्या खात्यात पैसे जमा करणाऱ्यांची नावे आज, ३ डिसेंबरला ‘मेट्रोपोलिस पोस्ट’ने प्रसिद्ध केल्यानंतर एकच खळबळ उडाली. यातील नागेश आष्टीकर हे ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर असल्याची पुष्टी पोलिसांकडून मिळाली नव्हती. मात्र आता खुद्द खा. आष्टीकर यांनी पैसे दिल्याची कबुली देताना वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने सहानुभूती मिळवली. कोणीतरी मदत मागितली म्हणून केवळ माणुसकीच्या नात्याने मदत केल्याचे आष्टीकर म्हणाले. रक्कम मोठी नव्हती, असेही ते म्हणाले.
कल्पनाला आज, ३ डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता, तिने कायद्याने उल्लंघन करत पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन अनेक दावे केले. ती म्हणाली, की नागेश पाटील आष्टीकर माझे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांनी मला मदत केली. तिच्याकडे सापडलेल्या धनादेशाबद्दल ती म्हणाली, की १९ कोटींचा चेक मला व्हॉट्स ॲपवर आला होता. तो फक्त मी प्रिंट केला आहे, असे सांगून तिने अशरफ माझा मित्र आहे, असे सांगितले.
६ महिन्यांपासून ॲम्बेसेडरमध्ये मुक्काम...
कल्पना भागवत बनावट कागदपत्रांच्या आधारे ६ महिन्यांपासून जालना रोडवरील ॲम्बेसेडर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी होती. सिडको पोलिसांनी २२ नोव्हेंबरला तिला अटक केली होती. हॉटेलमध्ये थांबण्यासाठी तिने जे आधारकार्ड दिले होते, त्यावर खाडाखोड केलेली होती. तिच्याकडे केंद्रीय लोकसेवा आयोगातील २०१७ ची यादीही तिच्याकडे मिळाली होती, ती यादीही बनावट असल्याचे स्पष्ट झाले होते. कल्पनाचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात ड्रायफ्रूट व्यावसायिक म्हणून ७ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ गिल (वय २४, ह. मु. जंगपुरा, नवी दिल्ली) याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात समोर आले होते. ती केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ओएसडींच्या नावाचा वापर करणारा तोतया अधिकारी डिम्पी देवेंद्रकुमार हरजाई (वय ३०, रा. पालम, दिल्ली) याच्या संपर्कात होती. तिघांचा एकमेकांच्या संपर्कात येण्याचा उद्देश अद्याप समोर आलेला नाही.

