अदिती, नजमाने रचलेल्या कारस्थानात पुरता अडकला दिलीपकुमार!, पैसे गेले, मुलगी गेली, हाती राहिले रेल्वेचे तिकीट...छत्रपती संभाजीनगरात घडली ही धक्कादायक घटना...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सध्या लग्नाच्या आमिषाने फसवणुकीच्या तक्रारी वाढल्या आहेत. लग्नासाठी प्रत्येक समाजात मुलीची कमी आहे. मुलीचा पिता हुंडा द्यायचा, ही पूर्वीची रीत आता मोडित निघाली असून, आता उलट मुलीसाठी पैसे मोजण्याची वेळ वर पक्षाकडील मंडळीवर आली आहे. याचा फायदा काही भामटे घेत आहेत. एका विधूर तरुणाला राजस्थानहून बोलावून लग्न लावून दिले. वधूसोबत तो तरुण परत राजस्थानला जायला निघाला, पण वधूने प्रवासातूनच पळ काढला... १ लाख ३० हजार रुपये तरुणाने मोजले होते. पैसेही गेले, आता मध्यस्थ महिलेचा फोनही लागेना, हातात परतण्याचे तिकीट तेवढे उरले आहेत... तेच घेऊन त्याने वेदांतनगर पोलीस ठाण्यात धक्का बसलेल्या चेहऱ्याने तक्रार दिली. पोलिसांनी मध्यस्‍थ महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध बुधवारी (१० डिसेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

दिलीपकुमार देवरामजी सेन (वय ३०, रा. सिरोई, पिनवाडा, राजस्थान) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई, वडील व भाऊ नरेश (वय ३६) याच्यासह राहतो. त्याच्या गावात सलूनचे दुकान चालवतो. त्याची पत्नी कोरोना काळात मरण पावली आहे. त्यामुळे त्याचे लग्न करण्याचे कुटुंबीयांनी ठरवले होते. भाऊ नरेश सेन हा दिलीपकुमारसाठी मुलगी बघत होता. त्याच्या ओळखीचे छत्रपती संभाजीनगर येथील फिरोज (पूर्ण नाव माहीत नाही.) व सलीम (पूर्ण नाव माहीत नाही.) यांच्याशी त्याची ओळख होती. रविवारी (७ डिसेंबर) फिरोजशी मोबाइलवर त्याने भावासाठी मुलगी हवी असल्याचे सांगितले. फिरोज व सलीम यांनी सांगितले, की आमच्याकडे मुलगी आहे.

तुम्ही मुलगी पाहण्यासाठी या. त्यानंतर फिरोज व सलीमने नरेशचे बोलणे नजमा खान नावाच्या महिलेशी करून दिले. नजमाने व्हॉटस्‌ ॲपवर मुलीचा फोटो पाठवला व मुलगी पहायला बोलावले. त्यामुळे मंगळवारी (९ डिसेंबर) दुपारी १ ला दिलीपकुमार, नरेश हे आईसह छत्रपती संभाजीनगरला आले. बाबा पेट्रोलपंपावर उतले असता तिथे नजमा व तिचे साथीदार त्यांना घ्यायला आले होते. नजमा व तिच्या साथीदारांनी तिघांना रिक्षात बसवून रेल्वस्टेशनजवळील हॉटेल पंजाब येथे आणले. या हॉटेलमध्ये सेन बंधू आणि त्यांची आई थांबली. हॉटेलमध्ये तयार होऊन तिघे नजमासोबत मुलगी पहायला निघाले. नजमा त्यांना घेऊन एन १३ सी सेक्टर भरतनगर वानखेडेनगर भागात घेऊन आली. तेथील एका गल्लीत मुलीच्या घरी नेले. तिथे मुलगी दाखवली. मुलगी अंदाजे २५ वर्षांची होती. तिने तिचे नाव अदिती विठ्ठल जगप्रताप असे सांगितले.

त्यावर नजमाने विचारले, की तुम्हाला मुलगी पसंत आहे का? त्यावर दिलीपकुमारने होकार भरला. त्यानंतर नजमाने मुलीलाही विचारले. मुलीनेही पसंती दर्शवली. त्यानंतर नजमाने मुलीच्या हातात पाचशे रुपये दिले. नजमा ही सेन बंधूंना म्हणाली, की तुम्ही समोर जा. मी थोड्या वेळात मुलीच्या आई- वडिलांसोबत चर्चा करून येते. त्यानंतर लगेचच नजमा मागे आली. सर्व जण परत पंजाब हॉटेल येथे आले. हॉटेलमध्ये नजमा म्हणाली, की आपल्याला परत मुलीच्या घरी जायचे आहे. तुम्ही सोबत पैसे आणले का? त्यावर सेन बंधूंनी नजमाला एक लाख ३० हजार रुपये दिले. नजमा म्हणाली, की मी मुलीचे लग्न तुमच्यासोबत करून देते. त्यानंतर काही वेळाने परत सर्व जण मुलीच्या घरी गेले. तिथे साध्या पद्धतीने लग्न लावले. लग्न झाल्यावर घरी जाण्यासाठी अदिती व तिची मैत्रीण चंदा हिच्यासह सेन बंधू राजस्थानला जायला निघाले. रेल्वेस्टेशनजवळ मुलींनी जेवण करायचे असल्याचे सांगितले. त्यांनी हॉटेल भारती येथे जेवण केले. त्याचे बिल साडेसहाशे रुपये दिलीपकुमार भरले. नजमाने दिलीपकुमारला बाजूला घेऊन परत लग्नाचे राहिलेले पैसे दे, असे म्हटले. त्यावर दिलीपकुमारने तिला आता माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. त्यानंतर नजमा खान तिथून निघून गेली.

अदिती व तिची मैत्रीण चंदा हिच्यासह रिक्षाने सर्व जण पंचवटी चौक येथे ट्रॅव्हल्स बस येथे आले. तेव्हा मुलगी अदिती व तिची मैत्रीण म्हणाली, की आम्ही बसने येत नाही. आम्ही रेल्वेने तुमच्यासोबत येतो. त्यावर सर्व जण रेल्वेस्टेशनला आले. रेल्वस्टेशनवर सर्वांची तिकीटे काढली. अदिती व तिच्या मैत्रिणीने आम्ही बाथरूमवरून जाऊन येतो, असे सांगून गेल्या व लगेच परत आल्या. तेवढ्यात रेल्वे आली. रेल्वेत बसून मनमाड येथे रात्री ११ ला सर्वजण पोहोचले. राजस्थानला जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी दिलीपकुमार जात असताना अदिती व तिची मैत्रीण चंदा म्हणाल्या, की रात्र झालेली आहे. त्यामुळे आपण राजस्थानला उद्या जाऊ. तुम्ही येथे राहण्याची सोय करा. त्यावर सर्वांनी हॉटेलची रूम बुक केली. अदिती व तिची मैत्रीण चंदा यांच्यासह सेन बंधू व त्यांची आई हॉटेलवर थांबले. दोघे जेवणाची सोय करत असतानाच अदिती व चंदा हॉटेलमधून मध्यरात्री साडेबाराला पळून गेल्या. दिलीपकुमार व नरेश यांनी त्यांचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यानंतर दिलीपकुमारने नजमाला कॉल केला असता तिने फोन उचलला नाही. त्यावरून दिलीपकुमारला कळले, की आपली फसवणूक झाली आहे. लग्नासाठी एक लाख तीस हजार रुपये उकळून व लग्नाचे आमिष दाखवून नजमा खान व तिच्या साथीदारांनी फसवणूक केली आहे. दिलीपकुमारच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी नजमा आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सुपे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत!

Latest News

कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत! कल्पना भागवतचं गूढ कायम... तपास पूर्ण, ‘चौकडी’ न्यायालयीन कोठडीत!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : तोतया आयएएस अधिकारी कल्पना त्र्यंबकराव भागवत (वय ४५, रा. चिनारगार्डन, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर), तिचा...
शिंदे गटात नवे नाराजीनाट्य, आता ‘पुत्रा’साठी आ. जैस्वाल-तनवाणींमध्ये तणाव!, जंजाळ ‘फ्रंटफूट’वर आल्याने ‘तुपे’ बॅकफूटवर...
भाडेकरू म्हणून राहायला यायचे अन्‌ घरमालकाचे घर साफ करून जायचे, इतक्या दिवसांनी सापडले बंटी-बबली, वाळूज पोलिसांच्या प्रयत्नांना मिळाले यश...
छत्रपती संभाजीनगर क्षेत्रात GSTR 3B कर विवरणपत्र पूर्ततेसाठी विशेष मोहीम सुरू
CM फंडात छत्रपती संभाजीनगरच्या एकाही राजकीय नेत्याने दिली नाही कवडीही!; संस्था-संघटना, सामान्यांनी दिले ३ कोटी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software