- News
- सिटी क्राईम
- १७ वर्षीय मुलाची ७ तासांत सिनेस्टाइल सुटका, बजरंग चौकातून झाले होते अपहरण!
१७ वर्षीय मुलाची ७ तासांत सिनेस्टाइल सुटका, बजरंग चौकातून झाले होते अपहरण!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडकोतील बजरंग चौकातून १७ वर्षीय मुलाचे कारमधून आलेल्या ७ जणांनी मिळून अपहरण केल्याची धक्कादायक घटना आज, ३ जानेवारीला पहाटे पाऊणच्या सुमारास (मध्यरात्री) घडली. सिडको पोलिसांनी सात तासांत मुलाची सुटका केली असून, अपहरणकर्त्या तिघांना अटक करण्यात यश मिळवले आहे. अन्य अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेवाळे, पोलीस अंमलदार मंगेश पवार, विशाल सोनवणे, शिवाजी भोसले, महादेव दाणे, देवा साबळे, प्रदीप फरकाडे यांनी तनय आणि अपहरणकर्त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू केला. पोलिसांना अपहरणकर्त्यांच्या कारचा क्रमांक मिळाला होता. ती कार रांजणगाव शेणपुंजीच्या गणेश सोनवणे यांची निघाली. पोलिसांनी लगेचच त्यांचे घर गाठले असता गणेश यांनी कार मुलगा विवेककडे असल्याचे सांगितले. पोलिसांनी विवेकचा मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध सुरू केला. वाळूजजवळ कार पोलिसांनी अडवली. त्यात विवेक गणेश सोनवणे (वय १९, रा. रांजणगाव), पांडुरंग माधव सोनवणे (वय २१, रा. जाधववाडी), रोहन सुनील डव्हळे (वय १९, रा. बजाजनगर) यांच्या मुसक्या आवळल्या.
अन्य अपहरणकर्त्यांचा शोध सुरू असल्याचे अतुल येरमे यांनी सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल नानेकर करत आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रोहन डव्हळे याने तनयला आपली स्पोर्ट्स बाइक विकली होती. मात्र ५ महिन्यांपासून पैसे दिले नव्हते. मध्यंतरी तो मुंबईला पळून गेला होता. तो शहरात आल्याची माहिती मिळताच रोहनने मित्रांसोबत मिळून त्याचे पैशांसाठी अपहरण केले. जेव्हा तनय घराबाहेर पडला, तेव्हा त्याला त्याच्या एका मित्राने कॉल करून कुठे आहेस, असे विचारले होते. त्यानेच अपहरणकर्त्यांना लोकेशन दिल्याची शक्यता आहे. पोलीस त्याचीही चौकशी करणार आहेत.

