सिडको बसस्थानकावर तरुणाने उडवली धमाल... बसला चावी पाहून बस चालवत पार्किंगमधून फलाटावर लावली... चालक, सुरक्षारक्षकांची एकच पळापळ...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिडको बसस्थानकावर शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री नऊच्या सुमाराच एकच गोंधळ उडाला. एका तरुणाने चक्क एसटी बसमध्ये शिरून पार्किंगमध्ये लावलेली बस चालवून फलाटावर लावली. वॉशरूममधून बाहेर आलेला चालक बस न दिसल्याने हादरला. बस शोधत असताना पाहतो तर चार क्रमांकाच्या फलाटावर बस लावलेली. त्यात तरुण बसलेला आणि त्याने बसच्या दरवाजाची काचही फोडली होती. सिडको एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.

शुभम संजय निकम (वय २४, रा. हनुमाननगर, छत्रपती संभाजीनगर) असे या तरुणाचे नाव आहे. तो हे कृत्‍य करताना नशेत होता, असे तक्रारीत एसटी चालक पिराजी ज्ञानोबा सोनकांबळे (वय ४०, रा. पानशिवडी ता. कंधार जि. नांदेड) यांनी म्हटले आहे. सोनकांबळे हे ते देगलूर आगारात कार्यरत आहेत. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की शुक्रवारी (९ जानेवारी) रात्री पावणेनऊला ते व वाहक बालाजी कचरू गायकवाड (वय ४३, रा. शिरूरदबडे ता. मुखेड जि. नांदेड) हे एसटी बस (क्र. एमएच १४, एमएच ९२३२) घेऊन देगलूरहून छत्रपती संभाजीनगरला आले. सिडको बसस्थानकात मुक्काम असल्याने बस त्यांनी सिडको बसस्थानकावरील पार्किंगमध्ये लावली आणि वॉशरूमला गेले.

लगेचच परत यायचे असल्याने नजरचुकीने चावी बसलाच राहिली. पाच मिनिटांत सोनकांबळे हे वॉशरूमवरून परतले असता बस लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी बसचा आजूबाजूला शोध घेतला. तेव्हा बस प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर लावलेली दिसून आली. सोनकांबळे यांनी जाऊन पाहणी केली असता बसमध्ये एक तरुण बसलेला होता. त्याला एसटी बसस्थानकावरील सुरक्षारक्षक आदिनाथ संतोष काकडे, ऋषिकेश भाऊसाहेब चोपडे यांच्या मदतीने पकडले. बसच्या दरवाजाची काच फुटलेली दिसली. त्याला सोनकांबळे यांनी "तू बस का चालवलीस व बसची काच तूच फोडली का? तू कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावर त्याने बसची काच मीच फोडली, असे उत्तर दिले. तो दारू पिलेला होता, असे तक्रारीत नमूद आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांना कळवताच त्यांनी सिडको बसस्थानकात येऊन त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस अंमलदार अरविंद मेने करत आहेत.

तरुणाच्या कुटुंबीयांचा खुलासा
दरम्यान,या घटनेवर तरुणाच्या कुटुंबीयांनी खुलासा केला आहे, की आमचा मुलगा दारू पिलेला नव्हता. त्‍याने बसचे कोणते नुकसानही केले नाही. आम्‍ही पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्याला आमच्या ताब्यात देऊन घरी न्यायला सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संशयास्पद वीज मीटर बदलणाऱ्या महावितरणच्या पथकावर हल्ला, पटेलनगरातील घटना

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software