युनानी डॉक्टरने केले ॲलोपॅथी उपचार, महिलेला गोळ्यांचे रिॲक्शन, २०३ दिवसांपासून सोसतेय मरणयातना!; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : युनानी डॉक्टर असतानाही ॲलोपॅथीचे उपचार करून २८ वर्षीय विवाहितेला मरणयातना देणाऱ्या डॉ. मोहम्मद इब्राहिम सौदागर (रा. अश-शिफा चॅरिटेबल क्लिनिक, लिमा कॉर्नर, नॅशनल दुध डेअरी शहाबाजार, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी रविवारी (४ जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे. विवाहितेचे डोळे दुखत होते. त्याला डोळ्यांचे काही माहीत नसताना त्याने तपासून गोळ्या दिल्या. या गोळ्यांचे रिॲक्शन येऊन गेल्या २०३ दिवसांपासून एमजीएम रुग्णालयात आयसीयूमध्ये आहे.

WhatsAppImage2026-01-05at10.54.24PM
हाच तो डॉक्टर.

बाबा खान मियाँ खान (वय ३२, रा. जफर गेट, लकडमंडी, मोंढा, भवानीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते पत्नी रईसा खान (वय २८), तीन मुलांसह राहतात. लोखंड मार्केटमध्ये मजुरी करतात. रईसा यांचे डोळे दुखत असल्याने बाबा खान यांनी त्यांना डॉ. सय्यद सादीक यांच्या मदनी आँखों का दवाखाना, नॅशनल दूध डेअरीजवळ, शहाबाजार छत्रपती संभाजीनगर येथे जायला सांगितले. १२ जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास रईसा या उपचारासाठी गेल्या. त्या मदनी डोळ्यांच्या दवाखान्यावरील अश-शिफा चॅरिटेबल क्लिनिकमध्ये गेल्या. त्यांना डोळ्यांच्या दवाखान्याबाबत विचारले असता डॉ. मोहम्मद इब्राहिम सौदागर याने त्यांना मी पाहतो, असे म्हटले व तपासून त्याच्याकडील गोळ्या दिल्या. सोबत गोळ्यांची चिठ्ठी दिली. त्यानंतर रईसा घरी आल्या.

जेवण करून दुपारी अडीचला व रात्री आठला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर त्यांना थंडी वाजून ताप आला. डोळे जास्त दुखू लागले. चेहरा लाल झाला. त्यानंतर दोन दिवसांत पूर्ण चेहरा विद्रूप होऊन चेहऱ्यावर जखमा झाल्या. १६ जूनला सकाळी बाबा खान हे रईसा यांना भारतनगर येथील डॉ. इस्माईल शेख यांच्याकडे नेले. त्यांनी रईसा यांना तपासले. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे रिॲक्शन आल्याचे सांगितले. रईसा यांची प्रकृती जास्त बिघडलेली दिसत असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना  १६ जूनला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून प्रकृती गंभीर असल्याने आयसीयूत (अतिदक्षता विभाग) दाखल केले. तेव्हापासून रईसा यांच्यावर एमजीएम हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागामध्ये उपचार चालू आहे.

निघाला युनानी डॉक्टर, दिल्या ॲलोपॅथीच्या गोळ्या...
 बाबा खान यांनी अश-शिफा चॅरीटेबल या क्लिनिकची चौकशी केली असता त्यांना समजले, की या क्लिनिकमध्ये काम करणारा डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सौदागर हा युनानी डॉक्टर (BUMS) आहे. परंतु त्याने रईसा यांना दिलेल्या गोळ्यांच्या चिठ्ठीवर स्वतः युनानी डॉक्टर असल्याचे लिहिलेले नाही. त्याच्याकडे डोळ्यांचा डॉक्टर उपलब्ध नसतानाही, डोळ्यांच्या आजाराबाबत काहीएक माहिती नसतानाही, अॅलोपॅथीच्या गोळ्या देण्याचा अधिकार नसतानाही जाणीवपूर्वक चुकीच्या ॲलोपॅथीच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे २३ जूनला बाबा खान यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

आजघडीला रईसा या २०३ दिवस झाले तरी एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना अन्न सेवन करता येत नाही. त्यांना डॉक्टरांनी दिलेली पावडर मिक्स करून त्याचा द्रवपदार्थ द्यावा लागतो. सतत व्हेंटीलेटर लावावे लागते. श्वास घेण्यास त्रास होतो. बाबा खान यांची अर्थिक परिस्थीती अत्यंत गरीबीची असून, ते मजुरी करतात. पत्नीच्या उपचारासाठी त्यांना सतत पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये राहावे लागत आहे. एमजीएम हॉस्पिटलचे चॅरिटीकडून मदत घेऊन, भारतनगर येथील प्लॉट, मोटरसायकल, वाहन असे विकून आजपर्यंत त्यांनी १५ ते १६ लाख रुपये पत्नीच्या उपचारावर खर्च केले आहेत.

शासकीय चौकशीत डॉक्टर दोषी...
या प्रकरणात पोलिसांनी घाटी रुग्णालयाच्या तज्‍ज्ञांच्या समितीचा अहवाल मागवला. त्यात अश-शिफा चॅरिटेबल क्लिनिक, लिमा कॉर्नर, नॅशनल दुध डेअरी शहाबाजार, छत्रपती संभाजीनगर या हॉस्पिटलमधील सादर केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता समितीचे मत स्पष्टपणे कळवले, की रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर हे BUMS (युनानी डॉक्टर) आहेत व BUMS डॉक्टरांना रुग्णांना Allopathic Medicine देण्याबाबत परवानगी नाही. त्यानंतर सिटी चौक पोलिसांनी डॉ. मोहम्मद इब्राहीम सौदागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट

Latest News

समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील गांधेली येथे मंगळवारी (१० मार्च) रात्री ९ च्या सुमारास हभप निवृत्ती...
सोशल मीडियातून ओळख, प्रेम, ४ महिने सहवास, नंतर जातीवरून युवतीला लाथाबुक्क्या!; प्रियकरासह त्याची आई, दोन बहिणी, भावाविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’, पाचोडची घटना
भरधाव पिकअपच्या धडकेने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील हृदयद्रावक घटना
नापिकी, कर्जबाजारीपणाचे आणखी २ बळी!; सिल्लोड, कन्नड तालुक्यातील २ शेतकऱ्यांनी कवटाळले मरण!!
फीट येऊन चुलीवर पडल्याने महिलेचा मृत्यू, सातारा परिसरातील संत ज्ञानेश्वरनगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software