- News
- सिटी क्राईम
- आयटी इंजिनिअर खून प्रकरण : दोन मारेकऱ्यांना मालेगावमध्ये घेतले ताब्यात
आयटी इंजिनिअर खून प्रकरण : दोन मारेकऱ्यांना मालेगावमध्ये घेतले ताब्यात
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयटी इंजिनिअर संतोष राजू पेट्टी याचा खून करून पसार झालेल्या दोन मारेकऱ्यांना चिकलठाणा पोलिसांच्या पथकाने मालेगाव (जि. नाशिक) येथे ताब्यात घेतले. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अर्जुन गणेश यादव (वय ३४, रा. कॅम्प गवळीवाडा, मालेगाव जि. नाशिक ह.मु. नागेश्वरवाडी, छत्रपती संभाजीनगर) आणि निखिल आबासाहेब संभेराव (वय ३२, […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आयटी इंजिनिअर संतोष राजू पेट्टी याचा खून करून पसार झालेल्या दोन मारेकऱ्यांना चिकलठाणा पोलिसांच्या पथकाने मालेगाव (जि. नाशिक) येथे ताब्यात घेतले. त्यांचा तिसरा साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अर्जुन गणेश यादव (वय ३४, रा. कॅम्प गवळीवाडा, मालेगाव जि. नाशिक ह.मु. नागेश्वरवाडी, छत्रपती संभाजीनगर) आणि निखिल आबासाहेब संभेराव (वय ३२, रा. कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर) अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत.
६ डिसेंबरला पहाटे साडेतीनच्या सुमारास झाल्टा फाटा येथील हॉटेल यशवंतमध्ये ही खुनाची घटना घडली होती. बी.टेक. झालेला संतोष आयटी कंपनीत कार्यरत होता. तो सध्या वर्क फ्रॉम होम करत होता. त्याचे कुटुंबीय रोपळेकर चौकाजवळ दूध डेअरी चालवतात. एका लग्नासाठी घरचे सर्व हैदराबादला गेलेले असल्याने संतोष एकटाच घरी होता. पहाटे तीनला काम आटोपल्यानंतर त्याला भूक लागली. त्यामुळे घराजवळील कारचालक राधेश्याम अशोक गडदे (वय २०, मूळ रा. मंठा) याला बोलावून घेत त्याच्यासोबत संतोष बीड बायपासने झाल्टा फाट्याकडे गेला.
या प्रकरणात हॉटेलचालक केदार बद्री शिंदे यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोल्ड्रिंकच्या बाटलीच्या बिलावरून हॉटेलचे कर्मचारी आणि मारेकऱ्यांत वाद झाला. त्याचवेळी तेथे संतोष जेवण करण्यासाठी गेले. हॉटेलमध्ये त्यांच्यासमोर सुरू असलेला वाद मिटविण्याच्या उद्देशाने ते दोन्ही मारेकऱ्यांना समजावण्याच्या सुरात आपलेच हॉटेल आहे. कशाला किरकिर करता, असे म्हणाले. हाच हॉटेलमालक असल्याचे समजून मारेकऱ्यांनी संतोषवर चाकूने हल्ला चढविला. हॉटेलचालक शिंदे यांनाही धमकावून चाकूने जखमी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत संतोष मरण पावले. त्यानंतर मारेकरी कारमधून पसार झाले होते. दोघा मारेकऱ्यांना अटक करण्याची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पवार, पोलीस निरीक्षक राधाकिरण दरवडे, पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, धुळे आणि कर्मचाऱ्यांनी केली.
गुन्हेगारी विश्वात मामा नावाने ओळख
मारेकरी अर्जुनविरुद्ध यापूर्वी चोरी, दरोडे, जीवे मारण्याचा प्रयत्न असे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी विश्वास त्याची ओळख मामा नावाने आहे. ज्या कारमधून मारेकरी पळून गेले, ती एका मुख्याध्यापकाची होती. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी ही कार एका गॅरेजमध्ये आठ दिवसांपूर्वी एका गॅरेजमध्ये विक्रीसाठी दिली होती. गॅरेजमालकाने ती अर्जुनला विकली होती.

