- News
- पॉलिटिक्स
- तिकीट न मिळाल्याने भाजप कार्यालयात नाराजांचा राडा, सावे-कराडांच्या केबीनचा दरवाजा तोडला, अंगावर पेट्...
तिकीट न मिळाल्याने भाजप कार्यालयात नाराजांचा राडा, सावे-कराडांच्या केबीनचा दरवाजा तोडला, अंगावर पेट्रोल घेतले, सावे-कराडांच्या नावाने ठणाणा...प्रचार कार्यालयाला कडक पोलीस संरक्षण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : भाजप-शिंदे गटाची युती तुटल्यानंतर तरी इच्छुक नाराज होणार नाहीत, सर्वांना व्यवस्थित तिकीटे मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात असतानाच, भाजपमध्ये निष्ठावंतांना तिकीट देण्याऐवजी अन्य पक्षातून आलेल्यांना तिकीट देण्यात आल्याने नाराजीचा मोठा भडका उडाला. निष्ठावंतांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्री अतुल सावे, डॉ. भागवत कराड यांच्यावर टीकास्त्र सोडले. पक्षाच्या प्रचार कार्यालयात रडारड सुरू होती, सोबतच आक्रमकपणे संतापही व्यक्त करण्यात येत होता. आत्मदहनाचा इशाराही हे इच्छुक देत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. नाराजांची समजूत काढताना पोलिसांच्या नाकीनऊ येत होते.
प्रभाग २० मधून दिव्या उल्हास मराठे या भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या आहेत. त्यांचेही तिकीट नाकारल्याने त्या इतक संतप्त झाल्या, की त्यांनी कार्यालयाबाहेरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पक्ष कठीण काळात होता, तेव्हा माझी मुले लहान असतानाही घरादाराचा विचार न करता पक्षाचे काम केले. आज आम्हा जुन्या कार्यकर्त्यांना डावलले, असा संताप त्या व्यक्त करत होत्या. नेत्यांच्या बायका एसीमध्ये बसतात आणि कार्यकर्त्या महिलांनी मात्र नेहमी रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा का, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी समर्थकांसह सावे आणि कराडांच्या केबिनचा दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. नंतर बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. पोलिसांनी त्यांना वेळीच पकडल्याने अनर्थ टळला. १८ वर्षांपासून पक्षात काम करत आहे. अतुल सावे यांना याचा जाब विचारणार आहे, असे दिव्या मराठे म्हणाल्या. दरम्यान, राडा करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कार्यालयाबाहेर नेले. भाजपमध्ये वाढलेली बंडाळी पुढे काय रुप घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

