- News
- जिल्हा न्यूज
- गंगापूर बाजार समितीतील व्यापाऱ्याचा मस्तवालपणा!; मिलाप ट्रेडिंग कंपनीने आधी शेतकऱ्याच्या कांद्यासाठी...
गंगापूर बाजार समितीतील व्यापाऱ्याचा मस्तवालपणा!; मिलाप ट्रेडिंग कंपनीने आधी शेतकऱ्याच्या कांद्यासाठी लिलावात बोली लावली, नंतर गाडीतून उतरवून घेताना म्हणे माल एकसारखा नाही, अर्धी गाडी खाली केल्यावर माल नाकारला, शेतकऱ्याला बसला आर्थिक फटका!!
गंगापूर (गणेश म्हैसमाळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : गंगापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. त्यांना सत्ताधाऱ्यांची साथ असल्याचा संशय असून, त्यामुळे शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सर्रास घडत आहे. आज, २५ एप्रिलला हद्दच झाली. मस्तवाल मिलाप ट्रेडिंग कंपनीने एका शेतकऱ्याच्या कांद्यासाठी लिलावात बोली लावली. नंतर त्याची आर्थिक लूट करण्याच्या उद्देशाने गाडी अर्धी खाली झाल्यावर माल एकसारखा नसल्याचे सांगत कांदा घेण्यास नकार दिला. नाईलाजाने शेतकऱ्याने ती अर्धी गाडीही देण्यास नकार दिला, तेव्हा जे कांदे उतरवले होते, ते भरण्यासाठी २०० रुपयांची लूटही करण्यात आली. असे प्रकार गंगापूर बाजार समितीत वारंवार घडत असून, बोलीत एक रक्कम आणि प्रत्यक्षात माल उतरवताना शेतकऱ्याला वेगवेगळी कारणे देताना तुटपुंजी रक्कम हातात टेकवली जात आहे. लिलावात त्यांना मालाचा दर्जा कसा कळत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी लक्ष घालावे आणि अशा मस्तवाल व्यापाऱ्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी होत आहे.
शेतकरी रावण गोरखनाथ कासार (रा. शिंगी, ता. गंगापूर) यांनी आज सकाळी बाजार समितीत मोकळा कांदा विकण्यासाठी आणला होता. कासार यांचे वडील रुग्णालयात असल्याने उपचारासाठी पैसे हवे असल्याने त्यांनी कांद्याला चांगला दर मिळेल, या आशेने आणला. शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार, हा कांदा लिलावाद्वारे मिलाप ट्रेडिंग कंपनीने घेतला. त्यानंतर कासार यांनी या कंपनीच्या गोडावूनकडे कांदा नेला. तेथे पोहोचल्यानंतर व्यापाऱ्याने अचानकपणे मालाची गुणवत्ता एकसारखी नसल्याचे कारण देत खरेदी करण्यास नकार दिला. माल एकसारखा नाही, असे सांगून कांदा परत घेऊन जाण्यास सांगितले. उतरवलेला कांदाही पुन्हा गाडी भरण्यासाठी कासार यांच्याकडून २०० रुपये घेण्यात आले. म्हणजे कांदा तर विकला गेलाच नाही, उलट २०० रुपये कासार यांचे गेले...
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सर्रास असे प्रकार घडत आहे. व्यापारी लिलावात शेतमाल घेतात. नंतर उतरवताना मालाच्या दर्जावर प्रश्न निर्माण करून हातात कमी पैसे देतात. माल परत नेण्यापेक्षा मिळेल त्या दरात शेतकरी विकण्यास मजबूर होतात. कासार यांना केवळ आर्थिक नुकसानच नव्हे तर मानसिक त्रासही सहन करावा लागला. त्यांनी बाजार समितीकडे लेखी तक्रार केली आहे. बाजार समितीच्या नियमानुसार, लिलाव पूर्ण झाल्यानंतर व्यापारी माल उचलण्यास नकार देऊ शकत नाही. दुपारच्या सत्रातही लिलावात व्यापाऱ्यांनी संगनमत करून भाव कमी दिल्याचा गंभीर आरोप कासार यांनी केला. सकाळी लिलावात मिळालेल्या भावापेक्षा दुपारी भाव कमी करण्यात आले. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले, असा आरोप कासार यांनी केला.
कांद्यासारखे नाशवंत पीक समोर असले की, व्यापाऱ्यांची नाटके सुरू असतात. शेतकऱ्याने माल विकला तरी नुकसान आणि नाही विकला तरी तो खराब होऊन नुकसान, त्यामुळे व्यापाऱ्यापुढे हात पसरविण्याशिवाय शेतकऱ्याला गंगापूर बाजार समितीत पर्याय राहिलेला नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

