- News
- सिटी क्राईम
- राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाट यांच्यात उभी दरार; जंजाळ म्हणाले, शिरसाट पक्षाला बुडवतील!; शिरसाट म्हणा...
राजेंद्र जंजाळ-मंत्री शिरसाट यांच्यात उभी दरार; जंजाळ म्हणाले, शिरसाट पक्षाला बुडवतील!; शिरसाट म्हणाले, अति महत्वाकांक्षा वाढल्याने असे होते!!
छत्रपती संभाजीनगर (मनोज सांगळे : मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरातील शिंदे गटाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांत उभी दरार पडली आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट टीका करत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ दंड थोपटले आहेत. शिरसाट यांनीही त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. शिरसाट यांची वागण्याची पद्धत नक्कीच पक्षाला बुडवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा हल्लाबोल जंजाळ यांनी केला आहे, तर मंत्री शिरसाटांच्या म्हणण्यानुसार, जंजाळ यांना जिल्हाप्रमुख मीच केले. अतिमहत्वाकांक्षा वाढल्याने असे होते... एकूणच पुढील काळात दोघांतील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटणार असल्याचे दिसत आहे.
मंत्री शिरसाट यांचे प्रत्युत्तर...
दरम्यान, राजेंद्र जंजाळ यांनी केलेल्या आरोपांना मंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, की राजेंद्र जंजाळ विद्वान आहेत. त्यांचे आता तक्रार करण्याचे कारण मला माहीत आहे. ते कशासाठी सगळीकडे बोंबलत फिरत आहेत याची उत्तरे मिळतील. त्यांना जिल्हाप्रमुख मी केले. अतिमहत्वाकांक्षा वाढल्याने असे होते. पण मनाची नाही तर जनाची लाज वाटली पाहिजे. कुठे जायचे असेल त्यांनी जावे. इतर पक्षांतून आलेले लोक तुम्हाला चालत नाहीत, अशाने पक्ष चालत नाही. सर्वांना सामावून घेऊन चालावे लागते. जिल्हाप्रमुखाचे अधिकार त्यांना कळत नाहीत, असे शरसंधान शिरसाट यांनी साधले.
जंजाळ कुठे जातील?
एकूणच राजकीय परिस्थिती पाहता राजेंद्र जंजाळ हे पक्ष सोडणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मग अशा परिस्थितीत ते कुठे जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. ते उद्धव गटात येतील का, की भाजपमध्ये जातील, अशी चर्चा सुरू आहे. भाजपमध्ये ते जातील, अशी दाट शक्यता दिसून येत आहे. जंजाळ यांनी शिरसाटांवर टीका करणे आता त्यांचा पक्षातील विषय असल्याने मी त्यावर जास्त बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

