हद कर दी... चक्क तोतयाची PMO सचिव म्हणून ऐट, DCP अतुलकर यांच्या चाणाक्ष नजरेतून झाली ‘पोलखोल’!, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकाराने राज्यात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : आज, १६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री शहरात होते. त्यामुळे बंदोबस्तात पोलीस अधिकारी व्यस्त होते. याही व्यस्ततेत पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांची नजर एका व्यक्तीवर खिळली, जो स्वतःला चक्क पंतप्रधान कार्यालयाचा सचिव सांगत होता. सत्कारासाठी त्याचे नाव पुकारले जाताच अतुलकर यांना संशय आला. पंतप्रधान कार्यालयातून कोणीही अधिकारी शहराच्या दौऱ्यावर नसल्याने अचानक आगंतुक पाहुणा कोण, असा प्रश्न त्यांना पडला. त्यांनी संशयावरून त्या पाहुण्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली अन्‌ तोतयाची पोलखोल झाली... वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करोडी येथील हॉटेल ग्रँड सरोवरमध्ये एका लग्न सोहळ्यात खुद्द मुख्यमंत्री आल्याने कडक बंदोबस्त होता, त्याचवेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला...

WhatsAppImage2025-11-16at9.31.07PM

अशोक भारत ठोंबरे (वय ४५, रा. साऊथ वेस्ट दिल्ली, मूळ रा. उंदरी, ता. केज, जि. बीड) असे या तोतयाचे नाव असून, त्याच्यासह सुरक्षारक्षक विकास प्रकाश पांडागळे (रा. भीमनगर, मनीष पार्कशेजारी कोंडवा खुर्द पुणे) यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सलीम अब्दुल गफूर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे ते सोलापूर हायवे रोडवरील करोडीजवळील हॉटेल ग्रॅण्ड सरोवर येथे रामजी कुलकर्णी यांच्या मुलीच्या विवाह सोहळा होता. सोहळ्याला मुख्यमंत्री येणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्ताची देखरेख पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक पोलीस आयुक्त भागिरथी पवार यांच्याकडे होती.

पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, शिवचरण पांढरे, सहायक पोलीस निरीक्षक संजय गित्ते, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील हे सहकाऱ्यांसह बंदोबस्तावर होते. काही पोलीस अंमलदार साध्या वेशात होते. दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास विवाह मंडपातील स्टेजवरील व्यक्तीने माईकमध्ये अशोक ठोंबरेचे नाव स्वागतासाठी पुकारले.  त्यावेळी पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांना संशय आला. पंतप्रधान कार्यालयाचे कोणीही अधिकारी शहरात दौऱ्यावर नसल्याने त्यांना ठोंबरेबद्दल संशय आला. त्यांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने तो निती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले. मात्र कसून चौकशी केली असता त्याच्याकडे तसा कुठलाही ओळख पुरावा मिळून आला नाही.

तो खोटी माहिती देत असल्याचे व लोकसेवक म्हणून तोतयगिरी करत असल्याचे समोर आले. त्याच्या झडतीत सुटकेसमध्ये पांढऱ्या पाटीवर लाल अक्षरात मराठीत भारत सरकार असे लिहिलेली पाटी व इंग्रजीत GOVT. OF INDIA असे लिहिलेली पाटी व वाहनावर लावण्यासाठी वापरण्यात येणारा भारतीय राष्ट्रध्वज अशा वस्तू मिळून आल्या. त्याने चक्क त्याच्या सुरक्षेसाठी विकास पांडागळे हा खासगी सुरक्षारक्षकही ठेवला होता. तोही ठोंबरेला सहकार्य करत असल्याने त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली. ठोंबरे याने अशाप्रकारे तोतयागिरी करून कोणत्याही नागरिकाची फसवणूक केली असल्यास वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software