- News
- पॉलिटिक्स
- राजू शिंदेंच्या पक्षबदलाने शिरसाटांसह खैरेही गोत्यात! ‘संभाजीनगर पश्चिम’ मध्ये जांगडगुत्ता !!
राजू शिंदेंच्या पक्षबदलाने शिरसाटांसह खैरेही गोत्यात! ‘संभाजीनगर पश्चिम’ मध्ये जांगडगुत्ता !!
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच पक्षबदलासाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते राजू शिंदे अखेर रविवारी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात विसावले. शिंदे यांचा हा प्रवेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच झाल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शिंदे यांनी सोडून जाणे हा भाजपला धक्का तर आहेच, पण सोबतच विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या शिंदे आणि […]
छत्रपती संभाजीनगर (विशेष प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच पक्षबदलासाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते राजू शिंदे अखेर रविवारी शिवबंधन बांधून घेत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात विसावले. शिंदे यांचा हा प्रवेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच झाल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. शिंदे यांनी सोडून जाणे हा भाजपला धक्का तर आहेच, पण सोबतच विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही सेनेच्या नेत्यांसाठीही हा जांगडगुत्ता होऊन बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
शिंदेंमुळे आपली उमेदवारी धोक्यात आल्याचे स्पष्ट होताच खैरे यांनी शिंदे यांच्या आगमनाला विरोध केल्याचे दिसत आहे. राजू शिंदे यांना लोकसभा निवडणुकीआधीच ठाकरे गटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण ते त्यावेळी भाजपमध्येच थांबले. एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना मदत करून त्यांनी निवडूनही आणले. संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून भुमरे यांना मताधिक्य मिळवून देण्यातही मदत केली आणि यामुळेच आपला पराभव झाला, अशी सल खैरे बोलून दाखवत आहेत. एवढेच नाही तर राजू शिंदे यांच्यामुळे दोनदा आपला पराभव झाल्याचे दु:ख व्यक्त करताना खैरे आता ते (राजू शिंदे) ठाकरे गटात आल्यावर पक्षासाठी काम करतील, अशी आशाही व्यक्त करीत आहेत.
खैरे यांच्या या बोलण्यातून त्यांच्या पश्चिम मतदारसंघातील विधानसभा उमेदवारीला शिंदे यांच्या आगमनाने खोडा बसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यातूनच खैरे लोकसभेला दोनदा पराभूत झाल्याने आता ठाकरे गटालाही ते विधानसभेला निवडून येतील, याचा भरोसा वाटत नसल्याने त्यांनी भाजपमधून शिंदे यांच्या रूपाने उमेदवार आयात केल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीला आता अवघे तीन महिने उरले आहेत. अशा वेळी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, नेत्यांची पळवापळवीही सुरू झाली आहे. राजू शिंदे यांनी पक्षातून बाहेर जाण्याने भाजपची या मतदारसंघातील ताकद काही अंशी कमी झाली, हे उघड आहे. सोबतच ठाकरे गटाची ताकद वाढल्याचेही स्पष्ट आहे. आता ठाकरे गट शिंदे यांची उमेदवारी कधी घोषित करतो, ज्या अपेक्षेने ते ठाकरे गटात गेले, ती अपेक्षा खरेच पूर्ण होते का, उमेदवारी मिळाली तरी ते खरेच शिरसाट यांना लढत देउ शकतील का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता काळच देउ शकणार आहे.

