- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरात हजारोंच्या संख्येत निघाला जनआक्रोश मोर्चा; मनोज जरांगे, इम्तियाज जलील, अंबादास
छत्रपती संभाजीनगरात हजारोंच्या संख्येत निघाला जनआक्रोश मोर्चा; मनोज जरांगे, इम्तियाज जलील, अंबादास दानवेंची सरकारवर कठोर शब्दांत टीका
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज, १९ जानेवारीला दुपारी छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय, सर्वजाती-धर्मीय लोक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकरूंच्या हाती भगवे व निळे झेंडे होते. क्रांतीचाैकातून मोर्चा निघाला, समारोप विभागीय आयुक्तालयासमोर दिल्लीगेट येथे सभेत झाला. मस्साजोग (जि. बीड) […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षेच्या मागणीसाठी आज, १९ जानेवारीला दुपारी छत्रपती संभाजीनगरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय, सर्वजाती-धर्मीय लोक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकरूंच्या हाती भगवे व निळे झेंडे होते. क्रांतीचाैकातून मोर्चा निघाला, समारोप विभागीय आयुक्तालयासमोर दिल्लीगेट येथे सभेत झाला.



मनोज जरांगे : संतोष देशमुख यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण एक इंचसुद्धा मागे हटणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आपण सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशीदेखील आहोत, असे ते म्हणाले. आरोपींना अटक झाली आहे. एक जण राहिला आहे, त्याचा शोधही लागेलच. ही एक मोठी साखळी आहे, आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. कुठल्या सरकारने देखील असे नेटवर्क पाहिले नसेल. या नेटवर्कने आपल्या संतोष देशमुखांचा जीव घेतला आहे, असे जरांगे म्हणाले.
आ. अंबादास दानवे : सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत खून झाला. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये सर्व स्पष्ट असताना एका कॉन्स्टेबलवर सरकार कारवाई करत नाही. त्यामुळे हा खून सरकार आश्रित आहे का, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. हा लढा देखील येणाऱ्या काळात ताकदीने सुरू ठेऊयात, असे अंबादास दानवे म्हणाले. सैफ खानवर हल्ला करणारा आरोपी दोन दिवसांत पकडला जातो, पण संतोष देशमुख यांचा खून करणारे लोक ४० दिवसानंतरही अद्याप फरारी आहेत, अशी टीका त्यांनी केली.

आनंदराज आंबेडकर : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावर काळे-निळे वण होते. त्यांना मारहाण झाल्यामुळेच कोठडीत मृत्यू झाला होता, हे स्पष्ट आहे. सरकारला सत्तेचा माज आला आहे, असा घणाघात आनंदराज आंबेडकर यांनी केला. बीड आणि परभणी हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
इम्तियाज जलील : आपल्या सर्वांना बीड आणि परभणी येथील घटनांविरोधात आवाज उठवावा लागेल. संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निर्घृण हत्या झाली. एक माणूस दुसऱ्या माणसाला कशाप्रकारे मारू शकतो, हे पाहून शैतान आणि हैवानाला देखील लाज वाटली असेल, असे इम्तियाज जलील म्हणाले. आम्ही पूर्ण ताकदीनीशी तुमच्यासोबत आहोत. या लढाईत तुमची साथ देऊ, असेही त्यांनी सांगितले.
धनंजय देशमुख : वेदनेची आणि भावनेची प्रखरता कधीही कमी न होणारी आहे. सगळे लोक हे न्यायाच्या भूमिकेत आहेत. न्याय मिळेपर्यंत आम्ही आणि समाज थांबणार नाही. देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळणारच आहे. आम्ही त्याच भूमिकेत आहोत. बीड आणि परभणी येथील घटना एवढ्या निंदनीय आहेत, त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश वाढत जाणार आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

