- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरात रंगला पॉलिटिकल ड्रामा!; एकनाथ शिंदे-अजित पवारांसोबत हे काय घडलं अन् सत्तारांनी
छत्रपती संभाजीनगरात रंगला पॉलिटिकल ड्रामा!; एकनाथ शिंदे-अजित पवारांसोबत हे काय घडलं अन् सत्तारांनी सावेंना का चूप बसवलं….
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरसाठी संडे हा पॉलिटिकल डे ठरला. राजकीय किस्से, टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोपांनी दिवसभर राजकीय वातावरण गरम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कळून चुकलं, की देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आली गाडी पुढेच जात नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री अतुल सावेंना शांत बसा म्हणत, गप्पही बसविण्याचा […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरसाठी संडे हा पॉलिटिकल डे ठरला. राजकीय किस्से, टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोपांनी दिवसभर राजकीय वातावरण गरम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कळून चुकलं, की देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आली गाडी पुढेच जात नाही. मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्री अतुल सावेंना शांत बसा म्हणत, गप्पही बसविण्याचा किस्सा घडला… दिवसभर काय गंमतीजंमजी घडल्या हे वाचूया….
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतून जिल्ह्यातील ८०० लाभार्थी यात्रेकरू रविवारी (६ ऑक्टोबर) सकाळी अकराला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकातून अयोध्येकडे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी रवाना झाले. या रेल्वेला पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री अतुल सावे, आ. विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, समाजकल्याणच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्याआधीची गोष्ट. अतुल सावे व आ. विक्रम काळे हे नियोजित वेळेवर रेल्वे स्टेशनवर आले. अतुल सावे मार्गदर्शन करत असताना अब्दुल सत्तार बोगीतील ज्येष्ठ प्रवाशांची भेट घेत होते. त्यामुळे माइकमधूनच सावे यांनी, पालकमंत्र्यांनी ताबडतोब इकडे यावे.
महिला व बालविकास खात्याने महिलांसाठी पिक ई रिक्षा योजना आणली आहे. योजनेच्या लाभार्थी नंदिनी आव्हाड, प्रीती काळे, उषा घोरपडे, कविता अंभोरे, चंचल थोरात आणि वैशाली गायकवाड यांना पिंक गुलाबी रिक्षाच्या चावीचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंक ई रिक्षात बसून ड्रायव्हिंग टेस्टसाठी निघाले. पण ती रिक्षा काही सुरू होईना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले व रिक्षात बसताच रिक्षा स्टार्ट झाल्याने देवेंद्र फडणवीसांशिवाय तुमची गाडी पुढे जाणारच नाही, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू झाली. काहीच वेळ बसून अजित पवार रिक्षातून उतरल्याने त्याचाही संदर्भ आगामी राजकारणाशी जोडला गेला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तीनचाकी रिक्षाचे सरकार असे म्हणतात. त्यातील एखादे चाक कधीही पंक्चर होईल, असा टोला लगावतात. याची प्रचिती या कार्यक्रमात वारंवार आल्याचे चित्र हाेते.
उद्धव ठाकरेंना आव्हान…
छत्रपती संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. मुलाशी (खा. श्रीकांत शिंदे) का भिडता, बापाशी भिडा, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना सुनावले. रविवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पूत्र खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना ‘मुख्यमंत्र्यांचं कारटं’ असा उल्लेख केला होता. त्याबद्दल पत्रकारांनी छेडले असता शिंदे यांनी ठाकरेंवर शरसंधान साधले. ते म्हणाले, की हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्माला येते असे म्हटले जाते. ते हेच (ठाकरे) उदाहरण आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही, तर काम करून उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते बिथरलेले आहेत, म्हणून तोंडाला येईल ते बोलत आहेत, असे शिंदे म्हणाले.
काँग्रेस OBC विभाग प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका…
लाडकी बहीण योजनेची ज्याप्रमाणे प्रसिद्धी केली जात आहे, तशी अदानी अंबानीसारख्या बड्या उद्योगपतींचे किती हजार कोटी कर्ज माफ केले याची प्रसिद्धी महायुती सरकार का करत नाही? या सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच ९ लाख ७७ हजार कोटींचे कर्ज आपल्या राज्यावर करून ठेवले आहे, असा घणाघात काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले. रविवारी गांधी भवनमध्ये काँग्रेस ओबीसी विभागाच्या शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक माळी यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश विभागाचे विजय राऊत, अशोक पगार, जगन्नाथ फुलारे, जिल्हाध्यक्ष अतिश पितळे, नारायण पारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

