- News
- पॉलिटिक्स
- छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात हायहोल्टेज ड्रामा!; राजू शिंदेंचे खोके, तनवाणींची माघार, थोरातांना ‘...
छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात हायहोल्टेज ड्रामा!; राजू शिंदेंचे खोके, तनवाणींची माघार, थोरातांना ‘मध्य’ची उमेदवारी अन् शक्तीप्रदर्शनाच्या बेडकुळ्या!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आज, २८ ऑक्टोबरला हायहोल्टेज ड्रामा रंगला. निष्ठावंतांना डावलून ठाकरे गटाने भाजपमधून आलेल्या किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी ठाकरेंना धडा देत उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी हिंदुत्वाचे कारण दिले. दोघांच्या लढतीत पुन्हा एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात आज, २८ ऑक्टोबरला हायहोल्टेज ड्रामा रंगला. निष्ठावंतांना डावलून ठाकरे गटाने भाजपमधून आलेल्या किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी ठाकरेंना धडा देत उमेदवारी मागे घेण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी हिंदुत्वाचे कारण दिले. दोघांच्या लढतीत पुन्हा एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करत त्यांनी उमेदवारीचा झेंडा ठाकरेंकडे परत सोपवला. त्यामुळे ठाकरे गटाला ऐनवेळी निष्ठावंत शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी द्यावी लागली आहे. तशी घोषणा जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सायंकाळी केली. याचवेळी दानवे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून तनवाणी यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केल्याची माहितीही दिली.
तनवाणी यांना ठाकरे गटाने एबी फॉर्मही दिला होता. ते उद्या, २९ ऑक्टोबरला उमेदवारीही दाखल करणार होते. मात्र एक दिवस त्यांनी ठाकरे गटाला धक्का दिलस. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. याचे कारण देताना ते म्हणाले, की २०१४ साली शिवसेना आणि भाजपात लढत झाली होती. हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन दोन्ही उमेदवार पडले आणि एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले. आताही तशीच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. प्रदीप जैस्वाल यांनी २०१९ सालची निवडणूक अखेरची असेल, असा शब्द दिला होता. मात्र त्यांची भेट घेऊनही ते माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे मीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. शहराच्या जनतेच्या हितासाठी मी हा निर्णय घेतला असून, कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. ठाकरे गटाने थोरातांना उमेदवारी देऊन चांगले केले. पद काढल्याने मी आता सामान्य शिवसैनिक राहिलो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तनवाणी आणि जैस्वाल हे दोघे कट्टर मित्र आहेत. वेगवेगळ्या पक्षात राहूनही मैत्री टिकून आहे. २०१४ मध्ये दोघे मध्य मतदारसंघात एकमेकांविरुद्ध ठाकले होते. तनवाणी भाजपकडून तर जैस्वाल शिवसेनेकडून लढले होते.

आ. प्रदीप जैस्वाल यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. त्यात त्यांनी आपली संपत्ती नमूद केली आहे. त्यांच्यासह दोन्ही मुले व सुनांच्या नावे एकूण २५.३९ कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ५ कोटी ६४ लाखांची स्थावर मालमत्ता असून, १.८९ कोटी रुपयांची संपत्ती स्वतः जैस्वाल यांच्या नावावर आहे. ३३ लाखांची अलिशान कार आहे. त्यांच्याकडे ४२० ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही बँकेचे ते कर्जदार नाहीत. देणी ५.७४ कोटी रुपये असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते काही संस्था आणि व्यक्तींना द्यायचे आहेत. शेतजमीन नसली तरी प्लॉटस, व्यवसायिक कॉम्प्लेक्स आहेत. ही १६.२३ कोटींची मालमत्ता आहे. वारशाने २.६७ कोटींची मालमत्ता आल्याचे त्यांनी म्हटले आहे. (सविस्तर मालमत्ता आणि शिक्षण, गुन्हेविषयक माहिती उद्या सकाळी देत आहोत.)

विलास औताडे, राजू शिंदे, संजय शिरसाट यांनी भरला अर्ज…
–फुलंब्री मतदारसंघाचे मविआचे काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांनी आज सकाळी मिरवणूक काढत फुलंब्री निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला. त्याआधी छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाण्यातील हनुमान चौकातून त्यांची मिरवणूक निघाली. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर रॅलीचा समारोप झाला.
–छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनीही रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले त्यांच्या रॅलीत सहभागी होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठे खोके आणून त्यावर पन्नास खोके एकदम ओके असे लिहित हे खोके उंचावत घोषणाबाजी केली.
–छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनीही क्रांती चौकातून रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. खा. संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, सिनेअभिनेते मंगेश देसाई यांची उपस्थिती होती. ओपन जीपमधून शिरसाट यांनी निवडणूक कार्यालय गाठून उमेदवारी अर्ज भरला.

