- News
- एक्सक्लुझिव्ह
- शिवसेना, ठाकरे सेना ते मामू सेना... वाटचाल किती निराशाजनक..., रशीद मामूंच्या प्रवेशानंतर ठाकरेंचा हि...
शिवसेना, ठाकरे सेना ते मामू सेना... वाटचाल किती निराशाजनक..., रशीद मामूंच्या प्रवेशानंतर ठाकरेंचा हिंदुत्ववादी चेहरा कायमचा हरवला?
मनोज सांगळे, संपादक, मेट्रोपोलिस पोस्ट
manojsangle@zohomail.in
भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेना ही काँग्रेस, शरद पवारांसोबत गेली... ही बाब न रूचलेल्या कट्टर हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या विद्रोहाला भाजपने साथ दिली, की विद्रोहच भाजपने घडवून आणला, असे म्हटले तरी, वाटचाल मात्र हिंदुत्वाच्या दिशेनेच राहिली, जशी बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित होती. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि शरद पवारांना मात्र सोडले नाही. जे राज्यात चालतं, तेच स्थानिक पातळीवरही उतरतं... त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांनी मुस्लिम मतांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीतही ठाकरे गटाच्या उमेदवारांनी तेच काम केले. त्यांचे प्रयत्न कितपत फळाला आले हा विषय निराळा, मात्र ज्यासाठी हा अट्टहास केला ते काही पदरात पडलेच नाही. आता महापालिका निवडणुकीतही ठाकरे गट तीच चूक करताना दिसत आहे. चंद्रकांत खैरे लोकसभेतील पराभवाने उमजून चुकले आहेत, त्यामुळे त्यांनी थेट थेट विरोध करण्याचे धाडस गेले, पण त्यांचे हे धाडस आ. अंबादास दानवे यांच्या निर्णयाला विरोध म्हणून आहे, की खरंच त्यांचे हिंदुत्व जागले आहे, यावर मंथन होताना दिसत आहे. काही असो, विरोधकांना मात्र आयतेच शस्त्र हाती लागले आहे, ते म्हणजे मामूसेना म्हणून हेटाळणी करण्याचे...
ठाकरे गटाला थेट मामूसेना म्हणून हिणवण्याचे काम सध्या सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे. याचं कारण ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांना पक्षात प्रवेश दिला. यासाठी अंबादास दानवे यांनी पुढाकार घेतला. ही बाब पदाधिकारीच नव्हे तर कार्यकर्त्यांना न उलगडणारी आहे. उद्या पक्षात कोणीही येईल तर त्या प्रत्येकाला प्रवेश देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ठाकरे गटाची वाटचाल नक्की कुणीकडे सुरू आहे, असा प्रश्न व्यक्त केला जात आहे. रशीद मामूंबद्दल चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलेली उद्विग्नता बरीच काही सांगून गेली आहे. खैरे यांनी १९८६ च्या ऐतिहासिक घटनेची आठवण करून दिली. १६ जानेवारी १९८६ रोजी शिवसेनेने समान नागरी कायद्यासाठी पहिला मोर्चा काढला होता. या मोर्चावर दगडफेक घडवून आणण्यात रशीद मामू यांचा हात होता. आम्ही ती दगडं खाल्ली आहेत. अशा माणसाला पक्षात घेतल्याने हिंदूंची ५० हजार मतं कमी होतील, असे खैरे यांनी म्हटले आहे. खैरे यांच्या थेट विरोधामागे निश्चित काय भावना आहे, हे गौडबंगाल असू शकते. कारण हेच खैरे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांसाठी बैठका घेत होते, त्यामुळे अंबादास दानवे यांनी रशीदमामूंना पक्षात आणले म्हणून त्यांचा विरोध असू शकतो, असे म्हटले तरी हे सत्य नाकारता येत नाही, की रशीद मामूंचा नेहमीच शिवसेनेला कडवा विरोध राहिला आहे. अर्ध्याहून अधिक पदाधिकारी सोडून गेलेत, अर्धा डझनहून अधिक महापौर सोडून गेलेत, त्यांना रोखण्यासाठी, भूमिकेवर विचार करण्याऐवजी मामूंसाठी पायघड्या ठाकरे गटाने अंथराव्यात, यामुळे कार्यकर्ते आश्चर्यचकीत झाले आहेतच, पण आता सामान्य जनतेलाही ठाकरे गटाची वाटचाल कुठे सुरू आहे, हे कळू लागलं आहे.
ठाकरे गटात सध्या जे काही कार्यकर्ते, पदाधिकारी उरले आहेत, ते का थांबलेत, याची चर्चा होऊ शकते. त्यामागे दोन कारणे आहेत. एकतर दिग्गज गेल्याने आपल्याला संधी मिळेल, अशी एक आशा त्यांना लागून आहे. दुसरे म्हणजे, अजूनही काहींची निष्ठा ठाकरे घराण्याशी जोडलेली आहे. पहिले कारण जे लोक बाळगून आहेत, त्यांचे स्वप्न पूर्ण होईलच याची काहीही शाश्वती नाही. कारण जेव्हा उमेदवारी देण्याची वेळ येते तेव्हा ठाकरे गट आयात केलेल्यांना संधी देतो, हे गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले आणि त्याचा फटकाही ठाकरे गटाने नंतर सोसला. मात्र त्यानंतरही भूमिकेत कोणताही बदल झाल्याचे पहायला मिळत नाही. ठाकरे गटातून जी मंडळी बाहेर पडली, त्यांचा निर्णय बरोबर होता की चूक, हे यथावकाश कळेलच, पण किमान जनतेसमोर जाताना ते ठामपणे हिंदुत्ववादी भूमिका मांडू शकतील, ही सुद्धा त्यांच्या निर्णयाला योग्य ठरवणारी बाब आहे.

