- News
- एक्सक्लुझिव्ह
- जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसाठी गावातच ३१ ऑगस्टप...
जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची पत्रकार परिषद : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेसाठी गावातच ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज स्विकारणार, गर्दी करू नका; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत. त्यानुसार आता ३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनी कागदपत्रे, दाखले मिळविण्यासाठी गर्दी करू नये. सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे. महिलांचे अर्ज हे त्यांच्या […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने काही अटी व नियम शिथिल केले आहेत. त्यानुसार आता ३१ ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज स्विकारण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनी कागदपत्रे, दाखले मिळविण्यासाठी गर्दी करू नये. सर्व पात्र महिलांना लाभ देण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे. महिलांचे अर्ज हे त्यांच्या गावातच स्विकारले जाणार आहेत, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती दिली की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केला तरीही महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, योजनेची माहिती व योजनेसाठी नाव नोंदणी करण्याबाबत गावस्तर, मंडळस्तर ते तालुकास्तर व जिल्हास्तर अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गावागावांत दवंडीद्वारे माहिती पोहोचविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. आपल्या गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत अर्ज भरायचे आहेत,असेही त्यांनी सांगितले. तसेच महिलांना बॅंक खाते उघडण्यासाठी व ते आधार संलग्न करण्यासाठीही सुविधा करण्यात आल्या आहेत. शून्य बॅलन्स आधारीत खाते उघडण्याबाबत बँकांना सुचित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिलांनी तालुका, जिल्हास्तरावर येण्याची व गर्दी करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही दलालांच्या भुलथापांना बळी पडू नका. आपल्या गावातच नोंदणी करता येणार आहे.नोंदणी साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. तरी कोणीही लुबाडणूक करीत असल्यास असे प्रकार तात्काळ निदर्शनास आणावे,असेही त्यांनी सांगितले.

