- Marathi News
- जिल्हा न्यूज
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने हाहाकार!, तिघांचा मृत्यू, कुठे काय झालं वाचा या एकाच बातमीत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने हाहाकार!, तिघांचा मृत्यू, कुठे काय झालं वाचा या एकाच बातमीत
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात पावसाने सोमवारी (२ सप्टेंबर) हाहाकार उडवला. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला. नदीकाठची जमीन वाहून गेली. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून खरीप हंगामातील हाती आलेली पिके वाया गेली असून, रब्बीच्या पिकांची झालेली पेरणीही कामातून गेली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात पावसाने सोमवारी (२ सप्टेंबर) हाहाकार उडवला. रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला. नदीकाठची जमीन वाहून गेली. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून खरीप हंगामातील हाती आलेली पिके वाया गेली असून, रब्बीच्या पिकांची झालेली पेरणीही कामातून गेली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. दरम्यान, आज, ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ला जायकवाडी धरणाची पाणीपातळी ८९.३३ टक्के झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
-सोयगाव शहरातील जुना बाजार चौक भागात सोना नदीच्या पुराचे पाणी १५ घरांत शिरून कौशल्याबाई मधुकर गव्हांडे व रवींद्र परेराव यांची घरे कोसळली. घरातील लोक वेळीच बाहेर पडल्याने वाचले. एका घराची भिंत कोसळून कोकिळाबाई संजय बागूल (वय ४०) व मोहित गणेश सपकाळे (वय ४) हे आजी-नातू गंभीर जखमी झाले. नांदा तांडा (ता. सोयगाव) शिवारात तुकाराम मोहन चव्हाण (वय ४०, रा. नांदा तांडा) पोळा सण साजरा करून शेतात गेले असता रात्री आठला पावसामुळे झाडाखाली थांबले अन् झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
-सिल्लोड शहरात अनेक नद्यांना पूर आला. नदीकाठच्या शेतातील पिके वाहून गेली. सिल्लोड शहरासह खुल्लोड, चिंचवन, आमसरी, देऊळगाव बाजार येथील २० घरांची पडझड झाली आहे. बहुली गावाला गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला. घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावरील घाटात दरड कोसळली. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अजिंठा, वेरूळ येथील धबधबे जोरदारपणे प्रवाहित झाले आहेत.
-कन्नड तालुक्यातील वाकोदला पुराच्या पाण्याने वेढा दिल्याने सोमवारी सकाळी ९ पासून दुपारी ४ पर्यंत या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता.
-छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी शिवारातील दुधना नदीला मोठा पूर येऊन आला. नायगव्हाण, अंजनडोह, आडगाव सरक, लिंगदरी या गावांत मुसळधार पाऊस झाला.
