- Marathi News
- सिटी क्राईम
- मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे PSI संतोष राऊत ACB च्या जाळ्यात!; ८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे PSI संतोष राऊत ACB च्या जाळ्यात!; ८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष राऊत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (७ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास ८ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात संशयिताला मदत करण्यासाठी त्याच्या भावाकडून राऊत यांनी लाच घेतली. राऊत यांच्याच मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात एसीबीने केलेल्या कारवाईची चर्चा सध्या शहर पोलीस दलात होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने एसीबीने सापळा रचला. अँथ्रासिन पावडर लावलेले ८ हजार रुपये व्यावसायिकाच्या शर्टच्या डाव्या बाजूच्या खिशात ठेवले. त्यानंतर व्यावसायिकाला सूचना दिली, की राऊत यांनी पैसे स्वीकारताच उजवा हात डोक्यावरून केसांमधून फिरवायचा. एसीबी पथक त्याच्या मागोमाग खासगी वाहनाने पोलीस ठाण्याच्या आडोशाला थांबले. व्यावसायिक हा एसीबीच्या पंचासोबत लाच देण्यास गेला असता राऊत यांनी पंचाला बाजूला थांबण्यास सांगून व्यावसायिकाला सोबत घेतले.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीसमोरून दोघे बाथरूमकडे कोपऱ्यात गेले. तिथे राऊत यांनी पैसे स्वीकारले. त्यानंतर व्यावसायिक पोलीस ठाण्याच्या दरवाजासमोर आला आणि एसीबी पथकाला इशारा केला. त्याचवेळी पथकाने राऊत यांच्याकडे धाव घेऊन रंगेहात पकडले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले करत आहेत. अंगझडतीत राऊत यांच्याकडे ८ हजार रुपयांची लाच आणि मोबाइल मिळून आला. त्यांच्या घराची झडतीही घेण्यात आली. ही कारवाई एसीबीच्या पोलीस अधीक्षक माधुरी केदार- कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सिंगारे, पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, वाल्मीक कोरे, संतोष तिगोटे यांच्यासह पोलीस अंमलदार राजेंद्र शिनकर, प्रकाश डोंगरदिवे, चालक पोलीस अंमलदार श्री. बागुल यांनी केली.
