- News
- सिटी क्राईम
- ऊसतोडीला येतो म्हणून ९ लाख घेतले, पैसे परत करण्याची वेळ आली तर... मुकादम संजय राठोड यांची खून की आत्...
ऊसतोडीला येतो म्हणून ९ लाख घेतले, पैसे परत करण्याची वेळ आली तर... मुकादम संजय राठोड यांची खून की आत्महत्या?, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ऊसतोडीला येतो असे सांगून ९ लाख रुपये घेतल्यानंतर तिन्ही कामगार उलटले. आम्ही येणार नाही, पैसेही देणार नाही, असे सांगून टाकले. पैशांसाठी मुकादम मागे लागल्याने त्याला पैसे परत करतो, असे म्हणून सोबत नेले. त्यानंतर मुकादमाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चिकलठाणा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सोमवारी (६ ऑक्टोबर) दाखल करून तपास सुरू केला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील परदरी तांडा (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे घडली.
संजय राठोड आणि त्यांचे मोठे भाऊ विजय फुलसिंग राठोड हे राहुवाडी (ता. अंबड) येथे गेले होते. तेथे जेवण करून बसलेले असताना पैसे घेऊन फसवणूक करणारे संजय लक्ष्मण चव्हाण, वनसिंग हेमा राठोड, संजू लोभा चव्हाण व एक अनोळखी (सर्व रा. परदरी तांडा ता. छत्रपती संभाजीनगर) हे आले. त्यांनी आम्ही घेतलेले पैसे परत देतो. आमच्यासोबत चल, असे सांगून संजय राठोड यांना परदरी तांडा येथे नेले. त्यानंतर ११ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता संजयचे भाऊ विजयने सुनिता राठोड यांना कॉल करून सांगितले, की संजयचे दुखत असून, त्याला घाटी रुग्णालयात आणले आहे.
सुनिता यांनी छत्रपती संभाजीनगरात येऊन घाटी रुग्णालय गाठले. तेव्हा डॉक्टरांकडून कळले, की संजय यांनी काहीतरी विषारी औषध पिल्याने मृत झाले आहेत. त्यांच्या मृत्यूला पैसे घेऊन फसवणारे संजय लक्ष्मण चव्हाण, वनसिंग हेमा राठोड, संजू लोभा चव्हाण हेच जबाबदार असल्याचे तक्रारीत सुनिता यांनी म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चौघांनी सोबत नेल्यानंतरच संजय राठोड यांचा मृत्यू झाल्याने याप्रकरणात काळेबेरे असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. ही हत्या आहे की आत्महत्याचा याचा सखोल तपास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

