- News
- सिटी क्राईम
- EXCLUSIVE : तृतीयपंथीयांवर पोलीस आयुक्तांची वक्रदृष्टी; नव्या आदेशाने केली कोंडी!, ‘काहीं’च्या विचि...
EXCLUSIVE : तृतीयपंथीयांवर पोलीस आयुक्तांची वक्रदृष्टी; नव्या आदेशाने केली कोंडी!, ‘काहीं’च्या विचित्र-बिभत्स वागणुकीचा ‘सर्वांना’च फटका, शहरात इतके आहेत तृतीयपंथी…
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील काही तृतीयपंथीयांनी नागरिकांना पैशांसाठी वेठीस धरल्याच्या घटना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून, चोहोबाजूंनी अशा तृतीयपंथीयांची नाकेबंदी केली आहे. मात्र याचा परिणाम सर्वच तृतीयपंथीयांवर झाला असून, काहींमुळे सर्वांनाच दोषी ठरवू नका, आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे. आम्हाला कुणी नोकरी दिली […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील काही तृतीयपंथीयांनी नागरिकांना पैशांसाठी वेठीस धरल्याच्या घटना पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून, चोहोबाजूंनी अशा तृतीयपंथीयांची नाकेबंदी केली आहे. मात्र याचा परिणाम सर्वच तृतीयपंथीयांवर झाला असून, काहींमुळे सर्वांनाच दोषी ठरवू नका, आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती तृतीयपंथीयांनी व्यक्त केली आहे. आम्हाला कुणी नोकरी दिली असती तर आम्हीच कुणाला पैसे मागितले नसते, असे सांगत तृतीयपंथीयांनी नागरिक स्वेच्छेने जेवढे देतील तेवढेच बहुतांश तृतीयपंथी घेतात. काही तृतीयपंथीयांच्या किंवा बनावट तृतीयपंथीयांच्या अतिरेकीपणामुळे सर्वांनाच जबाबदार धरू नका, असे म्हटले आहे.
आता एकट्याने, समूहाने फिरून शहरात कुठल्याच भागात आस्थापना, लग्न, उत्सवात तृतीयपंथीयांना पैसे मागण्यासाठी जाता येणार नाही. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी गुरुवारी याबाबत आदेश जारी केले. हे आदेश ९ ऑगस्ट ते ९ ऑक्टोबरपर्यंत तृतीयपंथीयांसाठी लागू असतील. आक्षेपार्ह इशारे, स्पर्श करून पैशांची मागणी करणाऱ्या सहा तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी अशा अतिरेकी तृतीयपंथीयांविरुद्धचा फास आवळला आहे. चौकात बंदी घातल्यानंतर काही तृतीयपंथी शोरूमध्ये शिरले. नवे वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांना हेरू लागले.
गेल्या वर्षी स्मार्ट सिटी प्रशासनाने तृतीयपंथीयांना नोकरी देण्याचा विचार केला होता. यात काहीच दिवस केवळ चार तृतीयपंथीयांनीच काम केले. त्यांचे शिक्षण अपूर्ण असणे, कामाची जाण नसणे तसेच मुख्यत्वे सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांची वागणूक यामुळे त्यांना काम सोडावे लागले. तृतीयपंथीयांना खासगी क्षेत्रातही काम करण्याची कुणी संधी देत नाही. ते साफसफाईचे कामही करायला तयार आहेत. मात्र लोकांची मानसिकता त्यांना काम देण्याची नाही.
कुठे राहतात तृतीयपंथी?
शहरात सध्या १ हजारांहून अधिक तृतीयपंथी आहेत. ते गारखेडा, शिवाजीनगर, खडकेश्वर परिसर, मोंढा नाका भागात समूहाने राहतात. विशेष म्हणजे काही बनावट तृतीयपंथीही निर्माण झाले असून महिलेचा पेहराव करून ते लोकांना पैशांसाठी त्रास देत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत. जी खरी तृतीयपंथी असते ती अशी वाईट कधीच वागत नाही. कारण तिने लहानपणापासून दुजाभावाची वागणूक सहन केलेली असते. ती अशी उद्धट वागत नाही. कारण त्यांच्याच मनात एक भीती असते, असे तृतीयपंथीयांनी सांगितले. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड म्हणाल्या, की पोलिस आयुक्तांचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे. मात्र तृतीयपंथीयांच्या उदरनिर्वाहासाठीही प्रशासनाने पुढाकार घ्यावा. साफसफाईसारख्या कामांत तृतीयपंथीयांचा समावेश केला तरी चालेल. माणुसकीनेही त्यांच्याकडे पाहिले पाहिजेत.

