- News
- सिटी क्राईम
- विभागीय क्रीडा संकुल घोटाळा : २१ कोटींचा घोटाळेबाज निघाला रंगीलारतन!; प्रेयसीला फोरबीचके गिफ्ट, प्रे...
विभागीय क्रीडा संकुल घोटाळा : २१ कोटींचा घोटाळेबाज निघाला रंगीलारतन!; प्रेयसीला फोरबीचके गिफ्ट, प्रेयसीसह सहकारी लिपिक मैत्रिणीवर उधळपट्टी
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाचे २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपये हडपणाऱ्या दोघा कंत्राटी कामगारांच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पदवीपर्यंत शिकलेल्या आणि १३ हजार रुपये पगार असलेल्या कंत्राटी लिपिक हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास) याने गेल्या ११ महिन्यांत विभागीय क्रीडा संकुलासाठी आलेल्या पैशांतून स्वतःच्या व प्रेयसीच्या […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाचे २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपये हडपणाऱ्या दोघा कंत्राटी कामगारांच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पदवीपर्यंत शिकलेल्या आणि १३ हजार रुपये पगार असलेल्या कंत्राटी लिपिक हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास) याने गेल्या ११ महिन्यांत विभागीय क्रीडा संकुलासाठी आलेल्या पैशांतून स्वतःच्या व प्रेयसीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट्स खरेदी केले. विदेशी बनावटीच्या गाड्याही खरेदी केल्या. एका सराफाला सोने खरेदीसाठी मोठी रक्कम देऊन तो फरारी झाला आहे. दुसरी अटकेत असलेली त्याची मैत्रीण आणि त्याच्यासोबत कंत्राटी लिपिक म्हणून काम करणारी यशोदा शेट्टी हिच्यावर त्याने मोठी उधळपट्टी केली. तिच्या खात्यात पैसे जमा करण्यासह तिचा पती जीवन कार्यप्पा विंजडा ऊर्फ बी. के. जीवन याच्या नावावर त्याने २७ लाखांची चारचाकी खरेदी केल्याचेही समोर आले.
गेल्या ४ महिन्यांत हर्षकुमारने १.३० कोटींची बीएमडब्ल्यू कार, ३२ लाखांची बीएमडब्ल्यूची दुचाकी, यशोदाचा पती जीवन कार्यप्पा विंजडा ऊर्फ बी. के. जीवनच्या नावावरही २७ लाखांची कार खरेदी केली. विमानतळ परिसरातील एका आलिशान सोसायटीत नुकताच एक चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट स्वतःच्या नावे तर दुसरा २ बेडरूमचा आलिशान फ्लॅट प्रेयसीच्या नावावर खरेदी केला आहे. त्याच्या एका बँक खात्यात ३ कोटींची एफडी सापडली असून, ४ बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत, तर बीएमडब्ल्यू कार पोलिसांना सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सापडली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी यशोदा व तिचा पती जीवन यांना सोमवारी (२३ डिसेंबर) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यशोदा न्यायालयात ढसाढसा रडत होती. हर्षकुमार एसयूव्ही कार घेऊन फरारी झालेला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

