- News
- उद्योग-व्यवसाय
- Side Story : आग लागलेली एडी फार्मा संशयाच्या घेऱ्यात!; विनापरवाना केमिकल उत्पादन?, आजूबाजूच्या उद्यो...
Side Story : आग लागलेली एडी फार्मा संशयाच्या घेऱ्यात!; विनापरवाना केमिकल उत्पादन?, आजूबाजूच्या उद्योजकांच्या तक्रारींकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचे चव्हाट्यावर...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील एडी फार्मा कंपनीला आज, ६ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत फर्निचर, यंत्रसामग्रीसह अन्य साहित्य असे १ कोटींहून अधिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. नुकसानीचा तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र या कंपनीचा गैरकारभार आणि त्याला पाठिशी घालणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यामुळे चव्हाट्यावर आले आहेत. कंपनीच्या परिसरातील उद्योजकांनी या कंपनीत विनापरवाना केमिकल उत्पादन सुरू असल्याची तक्रार मंडळाकडे केली होती. मात्र मंडळाने थातूरमातूर चौकशी करण्यापलिकडे काही केले नाही. त्यामुळे आजची मोठी दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अन्यथा कंपनी आणि मंडळाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच शेकले असते.
आगीने काही वेळातच धारण केले रौद्ररुप...
सकाळी साडेदहाच्या सुमारास कंपनीच्या पहिल्या मजल्यावरील लॅब विभागातूनच आगीची सुरुवात झाली. लॅबमध्ये ज्वलनशील केमिकल्स साठवून ठेवण्यात आले असल्याने आगीने क्षणार्धात भयंकर रूप धारण केले. काही क्षणांतच धुराचे प्रचंड लोट बाहेर पडू लागले आणि आग वरच्या मजल्यांवर पोहोचली. कंपनीतील १० ते १५ कर्मचारी आणि शेजारच्या कंपन्यांमधील मजूर भीतीने बाहेर धावले. परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेजारील काही कंपन्यांनीही सुरक्षेच्या दृष्टीने कामकाज तात्पुरते बंद केले. कंपनीचे व्यवस्थापक उमेश देवकर यांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. साडेअकराच्या सुमारास अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्यासोबत तीन खासगी पाणी टँकरही आग विझवण्यासाठी आले. कंपनीच्या अगदी शेजारीच गॅसचा प्लांट असल्याने धोका अधिकच वाढला होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी अधिक दक्षता घेत आग विझवण्याचे काम हाती घेतले. अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जवान आर. एच. घरत, ए. एस. देशमुख, एस. डी. वासनिक, एस. के. गायकवाड, वाय. डी. काळे, आर. के. जाट, पी. एस. खाडे, टी. बी. तांदळे, पी. के. राठोड आणि एस. बी. सोनवणे यांनी जवळपास दीड तास परिश्रम करत शेवटी दुपारी बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

